Thu, Mar 21, 2019 15:51होमपेज › Pune › अखेर वारकर्‍यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय

अखेर वारकर्‍यांना भेटवस्तू देण्याचा निर्णय

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:21PMपिंपरी : प्रतिनिधी

यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना भेटवस्तूऐवजी अधिकाधिक सुविधा देण्याची भूमिका भाजपने घेतली होती;  मात्र सोमवारी महापौर कक्षात गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत दिंडीप्रमुखांना ताडपत्री किंवा तंबू यापैकी उपलब्ध होईल ते भेटवस्तू स्वरूपात देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालिका प्रशासनास याबाबत काही अडचण असेल तर नगरसेवकांच्या मानधनातून ताडपत्री अथवा तंबू देऊ, असे महापौर नितीन काळजे यांनी वारकर्‍यांना सांगितले. यंदाच्या पालखी सोहळ्यात वारकर्‍यांना भेटवस्तूऐवजी अधिकाधिक सुविधा देण्याची भूमिका भाजपने घेतली होती.

भाजपने आज गटनेत्यांची बैठक बोलावली  होती.  भेटवस्तूची परंपरा खंडित करण्यास राष्ट्रवादी, शिवसेनेने विरोध दर्शविला होता.  पालिका भवनसमोर ‘टाळकुटो आंदोलन’ करणार असल्याचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी सांगितले होते. या आंदोलनासाठी बापू महाराज मोरे (चालक टाळगाव चिखली दिंडी सोहळा), बाळासाहेब हरगुडे, अशोक मोरे, उत्तमराव साने, रमेश मोरे, बाळासाहेब साने, गणपत आहेर, बाळासाहेब मोरे, दत्तात्रय भालेकर, नारायण बोर्‍हाडे, डी. डी. फुगे, कांतीलाल साने, अरुण दाभाडे हे सकाळी साडेअकरापासून विरोधी पक्षनेते दालनात बसून होते; मात्र गटनेत्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले.महापौर कक्षात महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक कैलास बारणे उपस्थित होते. 

या बैठकीनंतर चिखली, तळवडे, भोसरीतून आलेल्या वारकर्‍यांना महापौर काळजे यांनी गटनेत्यांच्या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. ते म्हणाले की, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या या शहरातून एकाच वेळी पंढरपूरकडे जातात, ही शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे वारकर्‍यांना भेटवस्तू देण्याची परंपरा चालू ठेवली पाहिजे, अशी भावना सर्वच गटनेत्यांनी व्यक्त केली. त्यामुळे दिंडी प्रमुखांना ताडपत्री किंवा तंबू भेटवस्तू स्वरूपात देणार आहे. आयुक्त व प्रशासनास अडचण असेल तर नगरसेवकांच्या मानधनातून हा खर्च केला जाईल. पक्षनेते एकनाथ पवार, सेनेचे गटनेते यांनीही प्रशासनास अडचण आली तर आम्ही नगरसेवक आमच्या मानधनातून भेटवस्तू देऊ, अशी ग्वाही दिली. या वेळी उपस्थित वारकर्‍यांनी ‘पंढरीनाथ महाराज की जय’च्या जयघोषात पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले.