Tue, Nov 20, 2018 17:09



होमपेज › Pune › ...अखेर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार सुरू

...अखेर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार सुरू

Published On: Aug 17 2018 1:36AM | Last Updated: Aug 16 2018 10:58PM



पिंपरी : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पिंपरी- चिंचवडचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय  कार्यान्वित करण्यात आले आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आयुक्तालयाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली होती. 

या वेळी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, महापौर राहुल जाधव, खासदार श्रीरंग बारणे, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने,  नेते एकनाथ पवार, पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे, स्मार्तना पाटील, नम्रता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.आयुक्तालयाचे कामकाज प्रेमलोक पार्क येथील इमारतीमधून चालणार आहे; मात्र इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने ऑटो क्लस्टर येथे तात्पुरत्या स्वरूपात आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयासाठी पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्याकडून 329 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी मंगळवारी (दि. 14) काढले. पुणे ग्रामीण पोलिसांकडून वर्ग करण्यात आलेल्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये 34  सहाय्यक पोलिस फौजदार, 79  पोलिस हवालदार आणि 216 पोलिस नाईक, पोलिस शिपाई, यांचा समावेश आहे; तसेच पुणे आयुक्तालयातून 1 सहायक आयुक्त, 26 पोलिस निरीक्षक, 18 सहायक पोलिस निरीक्षक, 70 उपनिरीक्षक वर्ग करण्यात आले आहेत.

पक्षाने दिलेला शब्द पाळला

शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन पिंपरी-चिंचवडचे स्वतंत्र पोलिस  आयुक्‍तालय सुरू करू, असा शब्द आम्ही पिंपरी-चिंचवडकरांना दिला होता. तो शब्द भाजपने पाळला असल्याचे मत पालकमंत्री गिरीश बापट यांनी या वेळी व्यक्‍त केले. ते म्हणाले, आयुक्‍तालयामुळे शहरातील समान्य नागरिक सुरक्षित झाला आहे.

वर्गवारी म्हणजे झोपेत धोंडा

पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रात काम करीत असलेल्या 32 सहायक निरीक्षक आणि 8 उपनिरीक्षकांना पुणे आयुक्तालयात वर्ग करण्याचे आदेश 14 ऑगस्टला मध्यरात्री देण्यात आले. यामध्ये बहुतांश तपास पथकातील तसेच उल्लेखनीय काम करणार्‍या अधिकार्‍यांचा समावेश आहे. अधिकार्‍यांच्या मोबाईलवर पहाटे वर्गवारीची यादी पडल्याने त्यांना हालचाल करण्यास संधी मिळाली नाही. त्यामुळे आमच्यावर झोपेत धोंडा घातला, अशा तिखट प्रतिक्रिया ‘त्या’ अधिकार्‍यांकडून दिल्या जात आहेत.