होमपेज › Pune › अखेर कामशेत-पवनानगर रस्ता खुला

अखेर कामशेत-पवनानगर रस्ता खुला

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 11:57PM
कामशेत : वार्ताहर 
कामशेतमधील पवनानगर फाट्यावरील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मागील वर्षीपासून उड्डाणपुलाचे काम  सुरू आहे.  उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे. या उड्डणपुलाच्या कामामुळे मागील पाच महिन्यांपासून कामशेत- पवनानगर रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे कामशेतवासीयांना पवनानगरकडे जाण्यासाठी सुमारे एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता. ही गैरसोय लक्षात घेत, स्थानिक राजकीय पदाधिकार्‍यांनी तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करत सदर रस्ता कामशेतकरांच्या ये-जा करण्यासाठी नुकताच खुला केला आहे. 
  पुलाचे काम करण्याआधी पूर्वतयारी व वाहतुकीची योग्य व्यवस्था न केल्याने  या कामामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, स्थानिकांनाही याचा त्रास होत आहे. महामार्गावरील वाहतूक  सेवा रस्त्यावरून वळविण्यात आलेली असून, सेवारस्त्याच्या कडेला टाकलेल्या मुरुमामुळे चिखल झाल्याने दुचाकी चालकांना वाहन चालविने जिकीरीचे ठरत आहे. 
पुलाच्या कामासाठी कामशेत- पवनानगर रस्ता बंद करण्यात आल्याने, कामशेतमध्ये अथवा पवनानगरकडे जाण्यासाठी एक किलोमीटरचा वळसा घालावा लागत होता; तसेच महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून वळविल्याने पादचार्‍यांना चालण्यास रस्ताच शिल्लक राहिला नव्हता. ही समस्या सोडविण्यासाठी व पुलाचे काम जलद गतीने व लोकांची गैरसोय न करता करावे यासाठी स्थानिक राजकीय पदाधिकार्‍यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार कामशेत मधील पुलाच्या कामाची पाहणी  करण्यासाठी व कामातील अडथळे व लोकांची समस्या सोडविण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता औटी, अभियंता संजय गांगुर्डे आदी नुकतेच कामशेतला आले होते.  या वेळी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाब म्हाळस्कर, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, शंकर शिंदे, सरपंच सारिका घोलप, काशिनाथ येवले आदी उपस्थित होते . यावेळी  स्थानिकांनी संबंधित अधिकार्‍यांना फैलावर घेत पुलाचे काम मुदतीत पूर्ण न केल्याचा जाब विचारला; तसेच पुलाच्या भरावासाठी  नित्कृष्ट दर्जाचा मुरूम वापरला जात आहे व प्रवाशांना जाण्यासाठी ठेवलेला रस्ता धोकाकादायक असल्याचे सांगितले. संबंधित अधिकार्‍यांनी स्थानिकांच्या समस्या विचारात घेऊन पुलाच्या लगतचे नैसर्गिक स्रोताचे पाणी काढण्यासाठी येत्या तीन दिवसात गटारचे काम पूर्ण करणार असल्याचे सांगितले. 
पण या बैठकीस पुलाचे काम करणारे मुख्य ठेकेदार उपस्थित नसल्याने दिलेली आश्‍वासने वेळेत पूर्ण होणार का अशी शंका उपस्थित होत आहे. अधिकार्‍यांच्या पाहणीनंतर गेल्या काही महिन्यांपासून बंद असणारा व  महामार्गाला जोडला जाणारा कामशेत- पवनानगर रस्ता  सोमवारी सकाळी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कामशेतकरांचा एक किलोमीटचा वळसा टळनार आहे;  परंतु या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाय योजनांचा अभाव असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.