Sun, Aug 25, 2019 08:07होमपेज › Pune › पिंपरी-निगडी मेट्रोचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात

पिंपरी-निगडी मेट्रोचा ‘डीपीआर’ अंतिम टप्प्यात

Published On: Jul 21 2018 1:32AM | Last Updated: Jul 21 2018 12:43AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड एम्पायर इस्टेट पूल ते निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतचा पुणे मेट्रोचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे; तसेच नाशिक फाटा ते चाकणचा डीपीआरही तयार झाला आहे. महिन्याअखेरीस तो पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार आहे. एम्पायर पूल ते भक्ती-शक्ती चौक या सुमारे 4 किलोमीटर अंतरचा मेट्रो मार्गिकेचा डीपीआर खासगी कंपनीकडून तयार करून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक फाटा ते चाकण या 19.50 किलोमीटर अंतराच्या मार्गाचा डीपीआरही तयार झाला आहे. 

त्या डीपीआरचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये दुरूस्तीचा काही सूचना महारेल मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केल्या आहेत. अलाईमेंट, डेपो, स्टेशन यामध्ये काही बदल सुचविले आहेत. या दुरूस्तीसह अंतिम डीपीआर जुले महिनाअखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला जाणार आहे. तसेच, स्वारगेट ते कात्रज या 9.50 किलोमीटर अंतराच्या मार्गाचा डीपीआरही तयार असून, तोही पुणे पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना सादर होईल, असे मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सांगितले. 

राज्य शासनाची मंजुरी महत्त्वाची

नव्या तीन मार्गाचा डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. तो लवकरच दोन्ही पालिकेच्या आयुक्तांना सादर केला जाईल. त्यास राज्य शासनाची आणि त्यानंतर केंद्राच्या मिनिस्ट्री ऑफ हाउसिंग अ‍ॅण्ड अर्बन अफेअर मंत्रालयाची मान्यतेची अत्यावश्यकता आहे. एका किलोमीटर अंतराची मेट्रो मार्गिका तयार करण्यासाठी 200 ते 250 कोटी रुपये खर्च येतो, असे मेट्रो रिच वनचे प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत मेट्रो कामास प्राधान्य

शहरात दापोडी ते निगडीपर्यंत मेट्रो होणे गरजेचे आहे. त्याशिवाय मेट्रो प्रवासाला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरीच्या पुढे चिंचवडच्या एम्पायर इस्टेट पूल ते निगडी भक्ती-शक्ती समुहशिल्प चौकापर्यंतच्या सुमारे 4 किलोमीटर अंतर मेट्रो मार्गिका तयार करण्यास महारेल मेट्रो कॉर्पोरेशन उत्सुक आहे. हे वाढीव काम बापोडी ते रेंजहिल्स मार्गावरील काम पूर्ण होईपर्यंत होऊ शकते. परिणामी, खर्चात बचत होणार असून, नागरिकांना पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर एका टप्प्यातच मेट्रोची सुविधा उपलब्ध होणार आहे.