Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Pune › निवडणुकीतील चित्रीकरण; खर्च साडेसात लाख 

निवडणुकीतील चित्रीकरण; खर्च साडेसात लाख 

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 1:01AMपिंपरी : प्रतिनिधी

महापालिकेची निवडणूक गेल्यावर्षी फेबु्रवारी महिन्यात झाली. त्यास सव्वा वर्षे होत आले आहेत. निवडणूक काळात निवडणूक कार्यालय व सर्वच प्रभागात करण्यात आलेले व्हिडिओ चित्रीकरणाचे बिल मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर आले आहे. त्याचा एकूण खर्च 7 लाख 36 हजार 920 रूपये आहे. 

पालिकेची निवडणूक होऊन सव्वा वर्षे लोटले आहे. निवडणूक काळात पालिका निवडणूक विभाग कार्यरत होता. प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करणे, उमेदवारांना अर्ज वाटप व स्वीकृती, त्यांची छाननी, चिन्ह वाटप, मतमोजणी तसेच, प्रचार व सभांचे पालिकेने चित्रीकरण केले होते. या संदर्भातील बिले आणि दरपत्रक सादर करण्याचा सूचना स्थायीने दिल्या होत्या. तसेच, संबधित बिले लेखा विभागाकडून तपासून घेण्याची सूचनाही केली होती. त्यामुळे बिले मंजुरीचा विषय प्रलंबित होता. 

निवडणूक काळात आकाश फोटो अ‍ॅण्ड व्हिडीओ शुटींग या संस्थेने व्हिडीओ चित्रीकरण केले होते. या कामासाठी व्हिडिओ कॅमेरा, कॅमेरामन व सीडीसह प्रतीदिन 1 हजार 780 रूपयांनी दर मंजुर करण्यात आला होता. संस्थेचे पहिले बिल 3 लाख 79 हजार आणि दुसरे बिल 3 लाख 57 हजार असे एकूण 7 लाख 36 हजार रूपये आहे. लेखा विभागाने बिल मंजुर केल्यानंतर सदर संस्थेला नुकतेच बिल अदा करण्यात आले आहे. हा विषय अवलोकन करण्यासाठी बुधवारी (दि.2) स्थायी समिती सभेपुढे ठेवण्यात आला आहे.