होमपेज › Pune › तीन हजार हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा

तीन हजार हक्काच्या घरांचा मार्ग मोकळा

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:55AMपुणे : प्रतिनिधी

घर नसलेल्या व्यक्तींना शहरात हक्काचे घर मिळण्यासाठी महत्त्वाचे पाऊल पडले आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात तीन हजार घरांच्या प्रकल्प आराखड्यास बुधवारी राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीने मंजुरी दिली. हडपसर आणि खराडी येथे ही घरे उभारली जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात तीन हजार जणांना हक्काचे घर मिळणार आहे.

देशात कोठेही घरे नसलेल्या व्यक्तीला 2022 पर्यंत हक्काचे घर मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रधानमंत्री आवास योजना’ आणली आहे. या योजनेंतर्गत पुणे शहरातून तब्बल 1 लाख 13 हजार नागरिकांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. या नागरिकांच्या अर्जाची छाननी करून पात्र व्यक्तींना घरे उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी शहरातील आठ ते दहा जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत, या जागांवर घरे उभारण्यासंबंधीचा आराखडा तयार करण्यासाठी दोन सल्लागार संस्थांची नेमणूक करण्यात आली होती.  

या संस्थांनी या हडपसर येथे तीन ठिकाणी तर खराडी येथील एका ठिकाणी अशा चार जागांवर तीन हजार घरांचा आराखडा तयार केला आहे. त्यात हडपसर येथील तीन जागांवर 1 हजार 22 घरांचा, तर खराडी येथील एका जागेवर 2 हजार 23 घरांच्या प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प आराखडा या योजनेची नोडल एजन्सी असलेल्या म्हाडामार्फत महापालिकेने राज्य शासनाच्या राज्यस्तरीय मान्यता व सनियंत्रण समितीकडे मंजुरीसाठी पाठविला होता. राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बुधवारी मुंबईत बैठक झाली. त्यात या प्रकल्प आराखड्यास मंजुरी देण्यात आली. या बैठकीला गृहविभागाचे प्रधानसचिव संजय कुमार, म्हाडाचे मिलिंद म्हैसकर, पुणे पालिकेचे आयुक्‍त कुणाल कुमार, योजनेचे प्रकल्प संचालक दिनेश रोकडे उपस्थित होते. राज्य सनियंत्रण समितीच्या मंजुरीनंतर आता केंद्राकडे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. अंतिम मंजुरीनंतर भूमिपूजनाचा नारळ फुटणार आहे.

दीड ते तीन वर्षांत घरे होणार तयार

या योजनेतील प्रकल्पांचे काम सुरू झाल्यानंतर पुढील दीड ते तीन वर्षांत ही घरे तयार होणार आहेत. खराडी येथील दोन हजार घरांचा प्रकल्प तीन ते साडेतीन तर हडपसर येथील प्रकल्प दीड ते दोन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.