Tue, Nov 20, 2018 23:16



होमपेज › Pune › थेरगाव परिसरात टोळक्याचा राडा

थेरगाव परिसरात टोळक्याचा राडा

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 10:51PM



पिंपरी : प्रतिनिधी

शहरात टोळक्याची दहशत माजवण्याचे प्रकार काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. यातच दहशत माजवण्याचा सर्वांत पहिला प्रकार म्हणजे रस्त्यावरील वाहनांची तोडफोड करणे. गेली दीड -दोन वर्षापासून शहराला लागलेली वाहन तोेडफोडीची किड काढण्याचे काम अद्याप तरी पोलिसांना जमलेले नाही. यामुळेच पुन्हा एकदा वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत थेरगावमध्ये तीन-चार जणांच्या टोळक्याने परिसरातील सुमारे 20 वाहनांची तोडफोड करुन मोेठे नुकसान केले. तसेच परिसरात दहशत माजवली. यावेळी नागरिकांनी तोडफोड करणार्‍या एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हा प्रकार बुधवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडला.

याप्रकरणी महेश मुरलीधर तारु (43, रा. नखातेनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिलेली असून पोलिसांनी तोडफोड करणार्‍या करण शिंदे, चिक्या सुर्यवंशी आणि नवनाथ भातकुटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकीवरुन टोळके आरडा-ओरडा करत, हातामध्ये कोयते, दांडके घेउन रस्त्यावर उभा असणार्‍या वाहनांची तोडफोड सुरु केली. धनगरबाबा मंदिर, नखातेनगर, नम्रता हौसिंग सोसायटी, शिक्षक कॉलनी थेरगाव येथील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. 

यावेळी स्थानिक नागरिकांनी तोडफोड करणार्‍यांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकाने कोयत्याचा धाक दाखवून खिशातील एक हजार रुपये काढून घेतले. तसेच धमकी दिली.  या टोळक्याने परिसरातील तब्बल 20 वाहनांची तोडफोड करत दहा ते बारा हजार रुपयांचे नुकसान करुन दहशत माजवली. नागरिकांनी पोलिसांना एकाला पकडून दिले असून इतर दोघे फरार आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तपास वाकड पोलिस करत आहेत.