Tue, Jul 16, 2019 01:36होमपेज › Pune › वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने साडेसहा लाख उकळले 

वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या बहाण्याने साडेसहा लाख उकळले 

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:51AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

मुलाला वर्धा येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलेला साडेसहा लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मोबाईलवर वैद्यकीय प्रवेशाबाबत माहितीचा मॅसेजवरील क्रमांकावर महिलेने संपर्क केला होता. त्यानुसार, त्यांना पैसे भरण्यास लावून फसविण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मेघा शशिकांत सातपुते (वय 46, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, निरज सहाय याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेघा सातपुते हे पुण्यातील एका नामांकित रुग्णालयात नोकरीस आहेत. तर, त्यांचे पती डॉक्टर आहेत. दरम्यान, त्यांचा मुलगा सिद्धांत नुकताच बारावी झाला आहे. त्याला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यामुळे सातपुते कुटुंबीय महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. 

त्यावेळी फिर्यादी यांचा भावाने त्यांना एका संस्थेच्या माध्यमातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश भरणे सुरू आहे. त्याबाबत मला एसएमएस आला असल्याचे सांगितले. तो एसएमएस फिर्यादी यांना त्याच्या भावाने पाठवला. त्यात संपर्कासाठी मोबाईल क्रमांक दिला होता. फिर्यादी यांनी त्यावर संपर्क केला. त्यावेळी डॉ. निरज सहाय असे नाव सांगितले. तसेच, फिर्यादी यांनी वर्धा व पुण्यातील महाविद्यालयांची यादी पाठविली. तसेच, त्यानंतर एक ईमेल आयडी दिला व मुलाचे शैक्षणिक कागदपत्र पाठविण्यास सांगितले. त्यांनी ती पाठविली.

त्यानंतर रजिस्ट्रेशन फी म्हणून प्रथम 49 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्याने वर्धातील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रवेश अर्ज व अंडरटेकिंग अर्ज पाठवून भरण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादी यांनी तो भरला आणि परत पाठवला.  दोन दिवसांनी फिर्यादी यांना वर्धा येथे प्रवेश मिळाला असल्याचे सांगून त्यांना अ‍ॅप्रुव्हल नोटीस पाठविले. त्यानंतर 6 लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादींनी सहा लाख रुपये भरले. दोन दिवसांनी फिर्यादी यांनी आरोपीला फोन केला. परंतु, त्याने फोन उचलला नाही. ईमेल केला. मात्र, त्यालाही प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी चौकशी करून आरोपीवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.