Thu, Apr 25, 2019 17:29होमपेज › Pune › पन्नाशीतील ५ पैकी १ जण मधुमेही

पन्नाशीतील ५ पैकी १ जण मधुमेही

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 12:05AMपुणे : प्रतिनिधी 

पन्नाशीच्या पुढील पाचपैकी एक पुणेकर व्यक्ती मधुमेही असल्याची माहिती ‘रॅपिड असेसमेंट ऑफ अव्हॉइडेबल ब्लाइंडनेस अँड डायबेटिक रेटिनोपॅथी’ (आरएएबी प्लस डीआर) सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कापसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलतर्फे शहरातील अंधत्वाचा अंदाज घेण्याकरिता आणि त्याची कारणे शोधण्याकरिता आरएएबी प्लस डीआर सर्वेक्षण करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुचेता कुलकर्णी म्हणाल्या, किती जण मधुमेही आहेत आणि किती जणांना डायबेटिक रेटिनोपॅथी आहे (मधुमेहींची डोळ्यांसंबंधातील समस्या जी कायमचे अंधत्व देऊ शकते) हे शोधण्याकरिता आम्ही तपासण्या देखील करण्यात आल्या आहेत. 22 टक्क्यांहून अधिक जणांना मधुमेह होता आणि त्यातील जवळपास 13 टक्के (दहापैकी एकाहून अधिक) जणांना डायबेटिक रेटिनोपॅथी आढळून आला आहे. 

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यातील दोन तृतीयांशहून अधिक (70%) जणांनी कधीच डायबेटिक रेटिनोपॅथीसाठी डोळ्यांची तपासणी केली नव्हती. या सर्वेक्षणामध्ये पुणे शहरात 3 हजार 600 व्यक्तींचा अभ्यास केला गेला आहे. हे सर्वेक्षण द लंडन स्कूल ऑफ हायजिन अ‍ॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिनच्या तांत्रिक साहाय्याने करण्यात आले आहे.

कापसे म्हणाले, या सर्वेक्षणातील निष्कर्ष शहरामध्ये मोतीबिंदूच्या तसेच डायबेटिक रेटिनोपॅथीच्या सेवा सुधारण्यासाठी आणि त्यासाठी नियोजन करण्यासाठी वापरले जाणार आहेत. देसाई आय हॉस्पिटलमध्ये यासाठी 20 जानेवारी रोजी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वेक्षणाचे निष्कर्ष आणि पुढील धोरणांसाठी नियोजन यासंबंधी चर्चा केली जाणार आहे. राज्य, जिल्हा आणि शहरातील आरोग्य अधिकारी, अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार असल्याचे कापसे यांनी सांगितले.