होमपेज › Pune › पाचवीच्या विद्यार्थिनीला मारहाण

पाचवीच्या विद्यार्थिनीला मारहाण

Published On: Dec 22 2017 1:29AM | Last Updated: Dec 22 2017 1:08AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

दोन दिवस शाळेत आली नाही म्हणून शिक्षकाने पाचवीत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनीला वेदम मारहाण केली. हा प्रकार जाधववाडी, चिखली येथील महानगरपालिकेच्या शाळेत गुरुवारी घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी बी. एस. आवारी यांनी दिले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, चिखली, जाधववाडी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेची साई जीवन प्राथमिक शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणारी 10 वर्षांच्या सोनम जैयस्वाल या विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्यामुळे ती दोन दिवस शाळेत गेली नव्हती. गैरहजर राहिल्यामुळे शिक्षक श्रीकृष्ण केंगळे यांनी दोन विद्यार्थ्यांना तिच्या घरी चौकशीला पाठवले. या विद्यार्थ्यांबरोबर शाळेमध्ये आली असता शिक्षक केंगळे यांनी तिला गैरहजर राहण्याचे कारण विचारले आणि त्यानंतर केंगळे यांनी तिला बेदम मारहाण केली. विद्यार्थिनीने घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. 

याबाबत पालिकेचे शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी यांना विचारले असता ते म्हणाले की,  मला आत्ताच माहिती मिळाली आहे. त्या शाळेच्या मुख्याध्यापिका रजेवर आहेत. गायकवाड नावाच्या शिक्षिकेकडे कामकाज दिले असून, मारहाण करणार्‍या केंगळे आणि गायकवाड या शिक्षिकेला चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. चौकशी करून दोषी शिक्षकावर कारवाई केली जाईल. विद्यार्थिनीला मारहाण करणार्‍या शिक्षकांची योग्य चौकशी करून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली आहे.