Mon, May 20, 2019 08:01होमपेज › Pune › पंधरा लाख ६५ हजार बेशिस्त वाहनचालक

पंधरा लाख ६५ हजार बेशिस्त वाहनचालक

Published On: Mar 19 2018 1:48AM | Last Updated: Mar 19 2018 12:50AMपुणे : नवनाथ शिंदे

राज्यातील सर्वाधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस वाहन खरेदीचा आलेख उंचावत आहे. त्यातच अरंद रस्ते, वाढणारी वाहने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे नागरिकांकडून खासगी वाहतुकीला प्राधान्य दिले जाते. वाहनांच्या गर्दीतून कमी वेळात इच्छित स्थळी जाण्यासाठी बहुतांश चालकांकडून वाहतुकीच्या नियमांना बगल दिली जात आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वर्षभरात राबविलेल्या मोहिमेत बेशिस्त वाहतुकीद्वारे वाहतूककोंडीला कारणीभूत ठरणार्‍या तब्बल 15 लाख 65 हजार चालकांचे चलन फाडून कारवाई केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उद्योग, व्यापार, शिक्षण, व्यवसाय करण्यासाठी स्थिरावलेल्या नागरिकांची संख्या वाढली आहे. दरम्यान शहराच्या विविध भागांत वेळेत पोहोचण्यासाठी दुचाकीवरून जाणार्‍या अनेक  चालकांकडून वाहतूकीचे झेब्रा क्रॉसिंग, नो पार्किंग, नो एन्ट्री, विनापरवाना वाहन चालविणे, आकर्षक वाहन क्रमांक लावणे, ट्रीपल सीट प्रवास, सिग्नलचे नियम तोडले जात आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर वाहतूक विभागाने वर्षभर राबविलेल्या मोहिमेंतर्गत चलन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये मार्च 2017 ते डिसेंबर 2017 अखेर 28 वाहतूक विभागांतर्गत तब्बल 8 लाख 39 हजार 605 बेशिस्त वाहनचालकांचे चलन फाडण्यात आले आहे.

त्यापैकी 5 लाख 95 हजार 621 जणांकडून 13 कोटी 48 लाख 80 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे; तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे व नो एंट्री करणार्‍या 4 लाख 51 हजार 460 बेशिस्तांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 98 लाख 37 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. चलन आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून 12 लाख 91 हजार 65 बेशिस्त चालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

बेशिस्त वाहनचालकांना लगाम घालण्यासाठी वाहतूक विभागाने 1 जानेवारी ते 14 मार्चपर्यंत राबविलेल्या मोहिमेत 2 लाख 73 हजार 999 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नवीन वर्षात अवघ्या अडीच महिन्यांत वाहतूक शाखेने बेशिस्त वाहतूक करणार्‍या 2 लाख 31 हजार 303 जणांकडून चलनच्या माध्यमातून 4 कोटी 97 लाख 80 हजारांचा दंड वसूल केला आहे; तर सीसीटीव्हीद्वारे 42 हजार 696 जणांवर कारवाई करुन 14 लाख 33 हजारांची वसुली केली आहे. वाहतूक विभागाने वर्षभरात शहरातील 15 लाख 65 हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून 19 कोटी 71 लाख 27 हजार 143 रुपयांची वसुली केली आहे; तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून केलेल्या कारवाईत 1 लाख 80 हजार 442 बेशिस्तांच्या मोबाईलवर कारवाईचा संदेश पाठविण्यात आला आहे.