Tue, Mar 26, 2019 22:33होमपेज › Pune › पुनर्वसनाच्या मागणीसाठी उग्र आंदोलन

पुनर्वसनाच्या मागणीसाठी उग्र आंदोलन

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 04 2018 12:06AMपुणे : प्रतिनिधी

मंगळवार पेठेतील रेल्वे ट्रॅकजवळील झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करावे, या प्रमुख मागणीसाठी येथील रहिवाशांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून महापालिका गेटसमोर शनिवारी सकाळी उग्र स्वरूपाचे आंदोलन केले. गेटवरून उड्या घेऊन पालिकेत घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांना आवरता आवरता पालिका सुरक्षा रक्षकांची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान कार्यालयीन वेळेच्या प्रारंभी मुख्य प्रवेशद्वारावर  करण्यात आलेल्या आंदोलनामुळे आणि पालिकेची लहान-मोठी प्रवेशद्वारे बंद केल्यामुळे कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पालिकेत जाण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागली. 

रेल्वे प्रशासनाने मंगळवार पेठेतील रेल्वे ट्रॅकच्या आसपास राहणार्‍या झोपडपट्टीधारकांना जागा खाली करण्याचा नोटिसा दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या गवनि घोषित असलेल्या जागेत एसआरए योजनेअंतर्गत पुनर्वसन करावे, पत्रा लाभार्थ्यांना कर्ज मिळण्याची व्यवस्था करावी, मंगळवार पेठेतील फायनल 898 सर्व्हे नं. 216-217 मधील काही जागेवर गवनि आरक्षण आणि उर्वरित जागेवर शॉपिंग सेंटरचे आरक्षण घोषित करण्यात आले आहे, त्यापैकी शॉपिंग सेंटरचे आरक्षण बदलून त्याचे झोपडपट्टी सुधार योजनेत रूपांतर करावे यांसह विविध मागण्यांसाठी येथील झोपडपट्टीधारकांनी महापालिकेवर मोर्चा काढून मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन केले. 

आंदोलकांनी मुख्य प्रवेशद्वाराच्या गेटवरून उड्या घेऊन पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात सहभागी झालेल्या वद्धांसह महिलांनी बोंब ठोकत हक्काची घरे मिळालीच पाहिजे, असा घोषणा देत गेट रेटण्याचा प्रयत्न केला. बाहेरील बाजूंनी आंदोलक आणि आतिल बाजूंनी सुरक्षा रक्षक गेटला रेटत होते. यावेळी अनेक आंदोलक गेटवर चढून उड्या मारण्याचा प्रयत्न करत होते.

तर काही आंदोलक भिंतीवरून उड्या मारून पालिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी आणि आरडाओरडा केला जात होता. या आंदोलकांना आवरताना पालिकेच्या सुरक्षा रक्षकांची चांगलीच दमछाक आझी. आंदोलकांचे रुद्ररुप पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांची सख्या कमी असल्याने पोलिसांनी बघ्याची भूमिका घेणेच पसंत केले.