Wed, Apr 24, 2019 07:29होमपेज › Pune › उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पालिकेस बसणार चाप

जयंती, महोत्सवावरील उधळपट्टीस आता ‘ब्रेक’ 

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 11:49PM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वर्षभर विविध सण, उत्सव, जयंती महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात. मात्र, उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे या खर्चाला लगाम बसणार आहे. आता पालिकेला आपल्या खर्चावरील उधळणीस मुरड घालावी लागणार आहे. 

मीरा-भाईंदर येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जंगम यांनी मीरा- भाईंदर महापालिकेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सार्वजनिक कार्यक्रमास मंडप, व्यासपीठ उभारणे, वीजपुरवठा, ध्वनीक्षेपक यंत्रणा सुविधा आदी पालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जातो. हा खर्च करण्यासाठी नगरसेवक संबंधित अधिकार्‍यांवर दबाव आणतात, असे याचिकेत म्हटले होते. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने करदात्यांचे पैसे महापालिकेने सण-उत्सवांवर खर्च करू नये, असा आदेश दिला आहे. तशा सूचना राज्य शासनालाही देण्यात आल्या आहेत. 

महापालिका अधिनियम कलम 63 व 66 मधील तरतूदीनुसार जयंती-पुण्यतिथीसंदर्भात जे निर्देश आहेत, त्याचे पालल करावे, इतर गोष्टींना निर्बंध घालावेत. यासंदर्भात आवश्यक त्या तरतुदी करून सर्व महापालिकांना निर्देश देण्याचा सूचना न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत.

विविध महापुरूषांची जयंती व पुण्यतिथी केवळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावे, असे शासनाचे धोरण आहे. मात्र, राजकीय मतांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका विविध जयंती, पुण्यतिथी, सण, उत्सव, महोत्सव मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा करते. मात्र, न्यायालयाच्या या आदेशामुळे आता पालिकेच्या खर्चाला लगाम बसणार आहे.

उत्सवावर पाण्यासारखा खर्च

आषाढी वारी पालखी सोहळ्यात दिंडी प्रमुखांना भेटवस्तू दिली जाते. यंदा ताडपत्री भेट दिली गेली. ताडपत्री खरेदीवरून विरोधकांनी गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वागत, गणेशोत्सव देखावा स्पर्धा आदींवर खर्च केला जातो. हा खर्च जनसंपर्क विभागामार्फत केला जातो. वर्षभरात सुमारे 1 कोटी 56 लाख रूपये खर्च केल्याची माहिती संबंधित विभागाने दिली आहे.

सन 2016-17 आर्थिक वर्षात महात्मा फुले जयंतीसाठी 69 हजार रूपये, महात्मा फुले व आंबेडकर जयंती महोत्सवासाठी 46 लाख रूपये, महात्मा बसवेश्‍वर जयंतीला 1 लाख 46 हजार, राजर्षी शाहू महाराज जयंतीला 5 लाख रूपये, अण्णा भाऊ साठे जयंतीला 18 लाख, महावीर जयंतीला 1 लाख आणि महर्षी वाल्मिकी जयंतीला 2 लाख यांसह विविध जयंती व महोत्सव, राष्ट्रीय दिन कार्यक्रमावर खर्च केला जातो. नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर या खर्चात विविध कार्यक्रमांची घुसखोरी करून अव्वाच्या सव्वा खर्च केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजपा आले तरी, या खर्चाची उंची गगनाला भिडत आहे.