Mon, Mar 25, 2019 05:26
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › डॉ. बाबा आढाव यांचे सरकारवर टीकास्त्र

माथाडी कायदा मोडीत काढण्याचा घाट

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 11:49PMपुणे : प्रतिनिधी

राज्यातील 36 मंडळाचा कारभार पाहण्यासाठी एकच मध्यवर्ती मंडळ स्थापन करण्याच्या नावावर सरकार असंघटीत कामगारांसाठी उपयुक्त असलेला माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने यासंदर्भात एक समिती नेमली असून या समितीला 31 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. माथाडी घटकांशी संबंधित व्यक्ती, संघटना यांच्याशी कोणतीही चर्चा न करता मूठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केला. दरम्यान, राज्य सरकारच्या या भूमिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

यावेळी हमाल महामंडळाचे खजिनदार नवनाथ बिनवडे, कामगार युनियचे अध्यश अमोल चव्हाण, सचिव संतोष नांगरे, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट, राजेश मोहोळ उपस्थित होते. 

डॉ. आढाव म्हणाले, देशात 40 ते 50 कोटी असंघटीत कामगार असून गेल्या काही वर्षांपासून त्यांची संख्या वाढत आहे. कामगार काम करत असलेल्या ठिकाणचा मालक, माथाडी मंडळ आणि सरकार या तिघांच्या माध्यमातून या कायद्याची अंमलबजावणी होत आहे. या कायद्याचा सरकारच्या तिजोरीवर काहीही परिणाम होत नाही. सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी   महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाने येत्या 23 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता मार्केट यार्ड येथील भुसार बाजारातील साहिल हॉटेल चौक येथे बैठक बोलविली आहे.

माथाडी कायद्यास पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. देशातील दोन राज्यांनी तर असंघटीत कामगारांना पेन्शन देणेही सुरू केले आहे. या पार्श्‍वभूमीवर मूठभर भांडवलदारासाठी सरकार हा कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे. नेमलेल्या समितीमधील सदस्यांपैकी कोणीही माथाडी घटकांशी संबंधित नसल्याचेही आढाव म्हणाले.