Tue, Jul 16, 2019 13:50होमपेज › Pune › ‘फर्ग्युसन’ला स्वतंत्र विद्यापीठ दर्जाबाबत ‘यूजीसी’चे अद्याप अधिकृत पत्र नाही

‘फर्ग्युसन’ला स्वतंत्र विद्यापीठ दर्जाबाबत ‘यूजीसी’चे अद्याप अधिकृत पत्र नाही

Published On: May 27 2018 1:20AM | Last Updated: May 27 2018 12:56AMपुणे : प्रतिनिधी 

पुण्यातील डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘फर्ग्युसन महाविद्यालय’ स्वतंत्र विद्यापीठ म्हणून पात्र ठरल्याची माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कार्यालयाने (यूजीसी) शनिवारी दिली. मात्र, स्वतंत्र विद्यापीठाबाबतचे अधिकृत पत्र यूजीसी अथवा राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) यांच्याकडून मिळालेले नाही. मंत्रालयात याबाबत रुसाने  उद्या बैठकीसाठी बोलविले असल्याची माहिती, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे आणि प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. 

फर्ग्युसन महाविद्यालयाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्य  शासनाच्या राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) यांच्याकडून प्रस्ताव पाठवावा, असे सांगितले होते. त्यानुसार महाविद्यालयाने  19 एप्रिलला रुसाला प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान, शनिवारी महाविद्यालयास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याचे वृत्त प्रसारित झाले. दरम्यान, महाविद्यालयाकडे अद्याप याबाबत यूजीसी अथवा रुसा यांचे अधिकृत पत्र मिळाले नसल्याची माहिती, शनिवारी संस्थेच्यावतीने देण्यात आली. 

या वेळी प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी म्हणाले, स्वतंत्र विद्यापीठाच्या विषयावर काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर लगेच दुसर्‍या दिवशी फर्ग्युसनला विद्यापीठाचा दर्जा मिळाल्याची बातम्या प्रसारित झाल्या. फर्ग्युसन महाविद्यालय स्वतंत्र विद्यापीठासाठी पात्र ठरले आहे, असे यूजीसीने फोनद्वारे कळविले आहे. परंतु, अधिकृत पत्र मिळाल्याशिवाय यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.  

क्लस्टर विद्यापीठाचा दर्जा मिळावा

यूजीसीने फर्ग्युसन महाविद्यालयाबरोबरच बंगळुरू येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय आणि सेंट जोसेफ कॉलेजला विद्यापीठासाठी पात्र ठरविले आहे. परंतु, फर्ग्युसनला अभिमत विद्यापीठ म्हणून दर्जा मिळणार की, स्वतंत्र की, पारंपरिक विद्यापीठाचा दर्जा मिळणार, याविषयी काहीच स्पष्टता नाही. दरम्यान, संस्थेच्या आवारात बीएमसीसी महाविद्यालय आहे. त्याचा विचार करून फर्ग्युसनला क्लस्टर विद्यापीठाचा दर्जा मिळावा, अशीच मागणी संस्थेची राहणार असून त्यासाठी आग्रही राहणार असल्याचे शरद कुंटे यांनी सांगितले.