होमपेज › Pune › स्कूलबससाठी हवी महिला चालक

स्कूलबससाठी हवी महिला चालक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : पूनम पाटील

हरियानातील गुरुग्राम स्कूलमधील घटनेनंतर पालकांमध्ये मुलांच्या सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. या घटनेत प्रथमदर्शनी स्कूलबसमधील सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले होते. कालांतराने वेगळ्या गोष्टी पुढे आल्या; परंतु त्यानंतर स्कूलबसच्या विविध घटनांमध्ये विद्यार्थ्यांचे नाहक बळी गेल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे  पालकांमध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, शहरातील पालकांनी आता स्कूलबससाठी महिला चालक हवी, अशी मागणी केली आहे. 

मागील काही दिवसांत या ना त्या कारणाने स्कूलबसचा विषय चर्चेत आहे. काही घटना बघता पालकही आता मुलांच्या सुरक्षेबाबत जागरूक झाले असून, त्यांनी शाळांकडे स्कूलबससाठी महिला चालक हवी, अशी मागणी केली आहे. मुंबई, ठाणे आदी शहरांत स्कूलबससाठी महिला चालक असून, पिंपरी-चिंचवड शहरात मात्र स्कूलबससाठी महिला चालक अद्याप दिसत नाहीत. शहरात इतर व्यवसायासाठी, घंटागाडीवर;  तसेच व्यावसायिक हेतूसाठी अनेक महिला चारचाकी चालवत आहेत; परंतु स्कूलबससाठी मात्र महिला पुढे येणे अपेक्षित आहे.

यानिमित्ताने महिलांना रोजगाराचे नवे क्षेत्र उपलब्ध होणार आहे. पुरुषांपेक्षा मुलांना हाताळण्याचे कौशल्य महिलांकडे अधिक असते. त्यामुळे पालकही बिनदिक्कत मुुलामुलींना स्कूलबसने पाठवू शकतील; परंतु याचा अर्थ सर्वच स्कूलबस चालक हे वाईट असतात असे नाही, तर त्यांच्या तुलनेत महिला वेगाने स्कूलबस चालवणार नाहीत; तसेच मुलांना नीट समजावून सांगतील, या हेतूने महिलांमधूनच खासकरून महिला चालकांची मागणी अधिक जोर धरत आहे;

मात्र यासाठी कमीत कमी पाच वर्षे गाडी चालवण्याचा अनुभव असेल  व पालकांनी मागणी केली, तर शाळा व्यवस्थापनाकडून नक्कीच महिला चालकांची व्यवस्था करण्यात येईल, असे एका इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. महिलांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण केली, तर आणखी महिला या क्षेत्रात पुढे येतील, अशी प्रतिक्रिया घंडागाडीवर काम करणार्‍या महिला चालकांनी दिली आहे.