Thu, Apr 25, 2019 13:26होमपेज › Pune › दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून मृत्यू

दोन चिमुकल्यांचा खड्ड्यात पडून मृत्यू

Published On: Apr 30 2018 1:45AM | Last Updated: Apr 30 2018 1:18AMपुणे/येरवडा : प्रतिनिधी

महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या आवारात बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैैवी घटना घडली. ही घटना रविवारी सायंकाळी येरवड्यातील लक्ष्मीनगरच्या मातोश्री शाळेच्या परिसरात घडली.

रुद्र रुपेश चव्हाण (8) आणि रुद्र दत्ता भुजबळ (6, रा. रामनगर, येरवडा) अशी मृत्यू झालेल्यांची नाव आहेत. या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले असून, बॉल खेळत असताना दोघे खड्ड्यात पडल्याचे पोलिसांनी सांगितले. येरवड्यातील लक्ष्मीनगर भागात मातोश्री ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. रविवारी दुपारी रुद्र  आणि रुद्र चव्हाण शाळेच्या आवारात खेळत होते. त्याठिकाणी काही खोल्यांचे बांधकामासाठी खड्डा खोदला असून त्यात सहा फूट पाणी साठलेले आहे. शााळेच्या परिसरात खेळत असताना दोघे या खड्ड्यात पडून पाण्यात बुडाले.

आजूबाजूला असलेल्या नागरिकांना  मुले बेपत्ता असल्याचे लक्षात येताच त्यांचा शोध घेण्यात आला. मुले खड्ड्यात पडल्याचा संशय आल्याने अग्निशमन दलाला ही माहिती कळविण्यात आली. खड्ड्यात साचलेल्या पाण्यातून दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरा येरवडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली. याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.