Fri, May 24, 2019 08:26होमपेज › Pune › मुलांच्या विकासासाठी आईबरोबरच वडिलांचाही सहवास महत्त्वाचा

मुलांच्या विकासासाठी आईबरोबरच वडिलांचाही सहवास महत्त्वाचा

Published On: May 25 2018 1:11AM | Last Updated: May 24 2018 10:35PMपुणे : प्रतिनिधी 

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आईबरोबरच वडिलांचा सहवासही तितकाच महत्त्वाचा असल्याचा निर्वाळा देत सत्र न्यायालयाने अपील करणार्‍या पत्नीला फटकारले. आपल्या करिअरमध्ये गुंग झालेल्या पत्नीने मुलाचा ताबा देण्यासाठी पतीची हेळसांड केल्याप्रकरणात न्यायालयाने पत्नीला दणका देताना सुटीच्या काळात मुलाचा ताबा देण्याचा आदेश दिला आहे. प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश मोहिते यांनी मुलाचा ताबा देण्यासंबंधीचा दिलेला आदेश अतिरिक्‍त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी कायम ठेवला आहे.  

पती,पत्नी हे  दोघेही परप्रांतीय असून दोघेही उच्च शिक्षित आहेत. तो आयटी क्षेत्रात नोकरीस आहे. लग्न झाल्यानंतर काही काळ व्यवस्थित घालविल्यानंतर लग्नानंतर तिने करिअरला प्राधान्य दिले. सांसारिक गोष्टीपासून पळ काढल्यामुळे दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद होऊ लागले. याचकाळात ती गर्भवती राहिली. तिला मुल नको होते. परंतु, त्याने आग्रह केल्यानंतर तिने एका बाळाला जन्म दिला. बाळंतपणासाठी माहेरी गेल्यानंतर ती पुन्हा सासरी आलीच नाही.  याच दरम्यान तिने नोकरी सुरू केली. त्याने तिच्या माहेरी जाऊन मुलाला आणि पत्नीला घरी पाठवून देण्याची विनंती केली. परंतु, त्यालाच तिच्या आई-वडिलांनी धमकी दिली. याच दरम्यान त्याने पुण्यात फ्लॅट खरेदी केल्यानंतर तिला पुन्हा मुलाला घेऊन पुण्यात नांदण्यासाठी बोलविले. 7 ते 8 महिने नांदली. यादरम्यान त्याची मुलाबरोबर अ‍ॅटॅचमेंट वाढली. त्यानंतर तिने मुलाला आईकडे पाठविले. तसेच स्वतःही घर सोडून पुण्यातच भाड्याने राहू लागली. त्यानंतर तिने 2015 मध्ये पती विरोधात न्यायालयात दावा दाखल केला. 

कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यात तिने पतीला दारूचे व्यसन असल्याचे तसेच अनेक गोष्टी दाव्याच्या निमित्ताने त्याच्या माथी मारल्या. त्यानंतर त्याने न्यायालयात मुलाला आठवड्यातून एकदा तरी भेटण्यासाठी ताबा मिळावा म्हणून अर्ज केला. न्यायालयाने दर रविवारी भेटण्याची मुभा दिली. या आदेशानंतरही तिने मुलाला भेटू देण्यासाठी टाळाटाळ केली.  अखेर त्याने सुटीच्या काळात मुलाचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायालयाने 11 मे ते 25 मे दरम्यान मुलाचा ताबा देण्याचे आदेश दिले. परंतु, या आदेशावर तिने सत्र न्यायालयात अपील दाखल केले. सत्र न्यायालयाने अपीलकर्ता महिलेला फटकारताना मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी आईबरोबरच वडिलांचाही सहवास तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेला आदेश योग्य असून वडिलांना मुलाचा ताबा मिळणे आवश्यक असल्याचे नमूद केले.