Fri, Apr 26, 2019 09:20होमपेज › Pune › धनगर समाजाचे आजपासून तीव्र आंदोलन 

धनगर समाजाचे आजपासून तीव्र आंदोलन 

Published On: Aug 01 2018 1:33AM | Last Updated: Aug 01 2018 12:36AMपुणे : प्रतिनिधी 

धनगर समाजाचा उल्लेख धनगड झाल्याने राज्यातील धनगर समाज स्वातंत्र्यापासून एसटी आरक्षणापासून वंचित राहिला आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले; परंतु आजपर्यंत ते पाळले नाही. सरकारने समाजाची फसवणूक केली असून, आरक्षणासाठी राज्यभरातील धनगर समाज आजपासून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. 

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातील समाज नेत्यांची बैठक मंगळवारी (दि. 31 जुलै) पुण्यात पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेंडगे बोलत होते. या वेळी माजी मंत्री अण्णा डांगे, आमदार रामहरी रूपनवर, आमदार राम वडकुते, आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकते यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

शेंडगे म्हणाले, धनगड ऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्यासाठी आतापर्यंत वेगवेगळ्या सरकारकडे पाठपुरावा केला. परंतु, कोणत्याही सरकारने धनगरांना न्याय दिला नाही. विद्यमान सरकारने आरक्षणाचे आश्‍वासन देऊन गेली चार वर्षे फक्त वेळकाढूपणा केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. धनगर समाजाच्या स्थितीवर अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या ‘टाटा सोशल सायन्स’चा अहवाल न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे सरकारला आरक्षणासाठी वेळ देण्यास समाज तयार नसून, राज्यात धनगर समाजाचे होणारे आंदोलन हे उग्र असेल.  परिणामी निर्माण होणार्‍या कायदा-सुवस्थेची जबाबदारी सरकारची असेल, असेही शेंडगे यांनी या वेळी सांगितले. 

सरकारने पुढाकार घेण्याची गरज...

बुधवारी 1 ऑगस्ट रोजी धनगर समाजाचा मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. सुमारे एक लाख समाज बांधव या मेळाव्याला जमतील, असा दावा करण्यात आला आहे. 5 ऑगस्टलाही समाजाची एक बैठक मुंबईत होणार आहे. थोडक्यात धनगर समाज आता आपल्या या मागणीसाठी आक्रमक झाला आहे.  मराठा समाजाचे आंदोलन ज्याप्रमाणे सरकारी दिरंगाईमुळे चिघळले, त्याप्रमाणे धनगर समाज आंदोलन चिघळण्यापूर्वी राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. पुणे जिल्ह्यात अगोदरच मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे. त्यातच धनगर समाजाचे आंदोलन उभे राहिल्यास स्थिती मोठी कठीण होणार आहे. पुणे जिल्ह्यात अगोदरच मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे. त्यातच धनगर समाजाचे आंदोलन उभे राहिल्यास स्थिती मोठी कठीण होणार आहे.