Fri, Jul 19, 2019 18:44होमपेज › Pune › रेड झोन बाधितांचे उपोषण अखेर स्थगित  

रेड झोन बाधितांचे उपोषण अखेर स्थगित  

Published On: Feb 16 2018 1:51AM | Last Updated: Feb 15 2018 11:53PMदेहूरोड : वार्ताहर

रेडझोनच्या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच दखल घेऊन यासंदर्भात संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. बुधवारी मुंबईत झालेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे तसेच आमदार बाळा भेगडे यांच्या विनंतीमुळे चौथ्या दिवशी सायंकाळी आंदोलन स्थगित करण्यात आले. सायंकाळी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनीही आंदोलकांची भेट घेऊन सोबत लढा सुरू ठेवण्याचे आश्‍वासन दिले. 

येथील दारूगोळा कोठारामुळे लागू करण्यात आलेल्या रेडझोनची हद्द कमी करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी रेडझोन संघटनेच्यावतीने सोमवारपासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू होते. बुधवारी मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. यावेळी आंदोलकांनी आपले गार्‍हाणे मुख्यमंत्र्यांपुढे मांडले. रेडझोनमुळे खचलेल्या शेतकर्‍यांनी आत्महत्येची भाषा सुरू केली असून प्रकरण खूप गंभीर वळणावर असल्याचे यावेळी आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर या प्रश्‍नी लक्ष घालण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. संरक्षणमंत्र्यांसोबत रेडझोन संस्थेच्या शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुदाम तरस यांनी दिली.

गुरूवारी सायंकाळी आंदोलनस्थळी आमदार भेगडे यांनी भेट देऊन मुख्यमंत्र्त्र्यांच्या सूचनेनुसार आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली. दरम्यान, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आंदोलनस्थळी पोहचले. कॅन्टोन्मेंट बोर्ड  कार्यालयाच्या आवारातील सभागृहात प्रदीर्घ चर्चेअंती उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रेडझोन 
संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदाम तरस, मदन सोनिगरा, बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, यदुनाथ डाखोरे, गणेश चव्हाण, धर्मपाल तंतरपाळे, लहूमामा शेलार, मोहन कदम, अंजनी बत्तल, सुर्यकांत सुर्वे आदी उपस्थित होते.