Thu, Mar 21, 2019 15:30होमपेज › Pune › अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाईचा फार्स

अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाईचा फार्स

Published On: Aug 25 2018 1:16AM | Last Updated: Aug 25 2018 12:54AMपुणे : प्रतिनिधी

सिंहगड रस्त्यांवरील हिंगणे परिसरातील बीडीपी आरक्षित टेकड्या फोडून करण्यात आलेल्या प्लॉटिंग आणि अनधिकृत बांधकामांवर महापालिकेकडून अखेर कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई करताना अगदी पाच ते सहा सीमाभिंत तोडून उर्वरित संपूर्ण प्लॉटिंगचे सीमा भिंतीवर कारवाई करण्याचे टाळण्यात आले आहे. त्यामुळे केवळ कारवाई म्हणजे निव्वळ फार्स ठरली आहे.

राज्य शासनाने महापालिका हद्दीतील जैववैविध्य उद्यानांच्या आरक्षणावर (बीडीपी)  शिक्का मोर्तब केला आहे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे या बीडीपी आरक्षित जमिनींवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. तर काही ठिकाणी आरक्षित टेकड्या फोडून त्यावर प्लॉटिगचे व्यवसायही जोमात सुरू आहे. सिंहगड रस्त्यांवरील हिंगणे परिसरात दामोदरनगर येथे बीडीपी आरक्षित टेकडी फोड करून सुरू असलेल्या प्लॉटिंगचा प्रकार दै. ‘पुढारी’ने गत महिन्यात चव्हाट्यावर आणला होता. त्यावर जाग आलेल्या प्रशासनाने याठिकाणच्या जागा मालकांना नोटीसा बजाविल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी पालिकेच्या बांधकाम विभागाच्या वतीने प्लॉटिंगवर बांधण्यात आलेल्या सीमा भिंती आणि काही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. मात्र, ही कारवाई किती निव्वळ देखावा असल्याचे समोर आले. संपूर्ण प्लॉटिंगच्या सीमा भिंती पाडण्याऐवजी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या भिंतीवर कारवाईत पाडण्यात आले. त्यानंतर ही उर्वरित कारवाई अर्धवट सोडून पालिकेचे कर्मचारी मागे फिरकले. त्यामुळे या कारवाईबाबत सांशकता निर्माण झाली आहे.