Sun, Mar 24, 2019 06:23होमपेज › Pune › ३१ जुलैनंतरचे व्याज शेतकर्‍यांना भरावे लागणार

३१ जुलैनंतरचे व्याज शेतकर्‍यांना भरावे लागणार

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 19 2018 12:52AMपुणे ः प्रतिनिधी

राज्यसरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत रुपये दीड लाखापर्यंतची रक्कम निश्‍चित करुन कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. शासनाने याबाबत वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार कर्जाच्या रकमेवर बँकांकडून 31 जुलै 2017 नंतर आकारले जाणारे व्याज हे संबंधित थकबाकीदार शेतकर्‍यांनीच भरावयाचे आहे. त्यास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (पीडीसीसी) बँकेच्या सूत्रांनीही दुजोरा दिला. 

जिल्हा बँकेंच्या अधिकार क्षेत्रात 1 हजार 284 विविध कार्यकारी सोसायट्या कार्यरत आहेत. जिल्हा बँकेंकडून सोसायट्यांना आणि त्यांच्याकडून शेतकर्‍यांना कर्जाचे वाटप होत असते. शासनाच्या निर्णयानुसार  दीड लाखापर्यंतच्या थकित रकमेसाठी कर्जमाफी, नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ आणि एकरकमी कर्ज परतफेडअंतर्गत (ओटीएस) कर्जमाफीचा लाभ निर्धारित केलेल्या रकमेपर्यंत देण्यात येत आहे. जिल्हा बँकेंकडून झालेल्या कर्ज वाटप अथवा थकित कर्जानुसारची ही रक्कम सुमारे 550 ते 600 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 

शेतकर्‍यांकडून कर्जमाफीचे अर्ज हे ऑनलाईनद्वारे भरण्यात आले. विकास सोसायट्या, बँकांची यादी आणि शासनाकडून आलेली यादी यांची पडताळणी करताना काही तफावती, चुका आढळल्या. त्यामुळे शासनाने दिवाळीपूर्वी कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा करुनही त्यास विलंब झाला. साहजिकच कर्जमाफीचा लाभाचा कालावधी वाढत गेला. दिवाळीनंतरच पहिल्या टप्प्यात अधिक शेतकर्‍यांना लाभ झाला.

त्यानंतर ही प्रक्रिया पुढे सुरूच राहिली. त्यामुळे कर्जमाफी मिळेपर्यंत 31 जुलै 2017 नंतर आकारले जाणारे व्याज कोणाकडून वसूल होणार असा प्रश्‍न निर्माण झालेला होता. याबाबत सहकार विभागाने कर्जमाफीची अंमलबजावणी करताना 1 ऑगस्टपासूनच्या व्याजाच्या आकारणीची जबाबदारी ही संबंधित सभासद किंवा बँकांवर टाकण्यात आली. विविध कार्यकारी सोसायट्यांच्या बँकखात्यांवर कर्जमाफीची रक्कम वर्ग करून संबंधित थकबाकीदाराच्या मुद्दल व व्याज वजा करून 31 जुलैनंतर होणारे व्याज नावावर मांडण्यात येईल. तसेच संबंधित थकबाकीदार लाभार्थी शेतकर्‍यांना ही रक्कम भरायची आहे.