Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Pune › शेततळ्याचं तुफान आलंय... 

शेततळ्याचं तुफान आलंय... 

Published On: May 11 2018 1:12AM | Last Updated: May 11 2018 12:09AMपुणे : दिगंबर दराडे

पाऊस पडत नाही, शेत करपेल, जनावरांना चारा नाही, असे म्हणणारा पिचलेला शेतकरीच आता दुष्काळावर मात करण्यासाठी पुढे सरसावला असल्याचे वास्तव समोर आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सुमारे साडेअकरा हजार शेतकर्‍यांनी आपल्या शेतात शेततळे घेऊन सकारात्मक पाऊल उचलले आहे. रोजगार हमी विभाग आणि कृषी विभागाकडून राबविण्यात येणार्‍या ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेला शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सर्वाधिक प्रतिसाद सोलापूरच्या शेतकर्‍यांनी दिला असून, तब्बल 4,770 शेतकर्‍यांनी शेततळे घेतले आहे, तर त्या पाठोपाठ सांगली जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. या जिल्ह्यात 3 हजार 700 शेततळी खोदण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी विभागाचे उपआयुक्‍त अजित पवार यांनी दै. ‘पुढारी’ला बोलताना दिली. 

2015-16,  2017-18 या वर्षात तब्बल पुणे विभागात साडेअकरा हजार शेततळी खोदण्यात आली आहेत. पुणे जिल्ह्यात 1990 शेततळी खोदण्यात आली आहेत, तर सातार्‍यामध्ये 960 शेततळी घेण्यात आली आहेत. सर्वात कमी कोल्हापूरला शेततळी बांधण्यात आली आहेत. 216 शेततळी इतका आकडा कोल्हापूरकरांनी गाठला आहे. अधिक शेततळ्यांची कामे पूर्ण केल्यामुळे आगामी काळात पिकांच्या उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास कृषी विभागाचे अधीक्षक विनयकुमार आवटे यांनी व्यक्‍त केला आहे. 

पुणे विभागात दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे शेतकर्‍यांना पिके जगविण्यासाठी शेततळ्यांशिवाय पर्याय नाही. यामुळेच शेतकर्‍यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पावसाळ्यात पाऊस न झाल्यास पिकांवर ताण येतो. यामुळे हातातोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळून जाते; मात्र आता शेततळ्यांमुळे पिकांना आधार मिळणार आहे. शेततळ्यासाठी शासनाकडून पन्नास हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे. दुष्काळी भागातील शेतकर्‍यांच्या बरोबर आता सधन भागातील शेतकरीही शेततळी बांधण्यासाठी पुढे येत आहे. 

बारामती, इंदापूर, दौंड, कराड या परिसरातील शेतकर्‍यांनी शेततळी बांधण्याचा संकल्प सोडला आहे. दिवसेंदिवस बदलत असलेले शेतीचे स्वरूप, ठिंबक सिंचनाचा वापर, कमीत कमी पाण्यामध्ये पीक घेण्याची पद्धत विकसित होत आहे. राज्यातील पर्जन्यमानावर आधारित कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंधारण माध्यमातून उपलब्धता वाढविण्यासाठी माहाराष्ट्र शासनाने यापूर्वी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान पद्धतीने शेततळे ही योजना राबवली होती. 

शासन ‘मागेल त्याला शेततळे’ ही वैयक्‍तिक लाभाची योजना राबवण्यात येत आहे. या योजनेला शेतकर्‍यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी योजनेच्या धर्तीवर अनुदान पद्धतीने शेततळी बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन शेतकर्‍याचे जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. या योजनेत राज्यात 51 हजार 500 तळी बांधण्यात येणार आहेत. या योजनेला पुणे विभागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.