Fri, Nov 16, 2018 23:29



होमपेज › Pune › जमीन विक्रीची घाई नको : उद्योगमंत्री

जमीन विक्रीची घाई नको : उद्योगमंत्री

Published On: Jun 14 2018 1:35AM | Last Updated: Jun 14 2018 12:59AM



पुणे : प्रतिनिधी

राज्यात अनेक ठिकाणी विविध प्रकल्प घोषित करण्यात आले असून, त्यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहित कराव्या लागणार आहेत. मात्र, अनेक ठिकाणी काही खासगी लोक प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या जमिनी खरेदी करत आहेत. या सर्व प्रकारात शेतकर्‍यांचे नुकसान होत असून, शासन प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या चारपट मोबदला देत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी खासगी व्यक्तींना विकू नये, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी पुण्यात केले. 

कोकणात होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असून, अनेक गावांंना हा प्रकल्प नको आहे. तसे ठराव ग्रामपंचायतींनी राज्य शासनाला सादर केले आहेत. त्यानुसार या प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, ती लवकरच रद्द होईल, अशी माहितीही देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, राज्यात उद्योेगांना चांगले वातावरण असून, औद्योगिकीकरणात मोठी वाढ होत आहे.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत विविध औद्योेगिक कंपन्यांबरोबर 12 लाख कोटी रुपयांचे करार झाले असून, राज्य शासनाबरोबर करार केलेल्या 2 हजार 400 कंपन्यांपैकी 2 हजार 121 कंपन्यांनी उद्योेग सुरू केले आहेत; तसेच उद्योेगांसाठी लागणारी जमीन, पाणी, वीज, आदी पायाभूत सुविधेसह राज्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध आहे. राज्यात 288 औद्योेगिक क्षेत्र असून, स्थानिक जनतेला उद्योग नको असतील तर, त्यांच्यावर ते लादू नयेत, असे राज्य शासनाचे धोरण असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

अनेक उद्योजकांनी एमआयडीसीमध्ये जमिनी घेतल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यावर उद्योग सुरु केलेला नाही. त्यामुळे या जमिनी मोकळ्या असून, हे भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा प्रकारच्या मोकळ्या भूखंडांपैकी दोन हजार भूखंड ताब्यात घेण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.