Tue, Jun 25, 2019 22:09होमपेज › Pune › शेतकर्‍यांचा गूळ उत्पादनाकडे ओढा

शेतकर्‍यांचा गूळ उत्पादनाकडे ओढा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्यासह परराज्यांत गुळाचा हंगाम जोमात सुरू झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाचे भरघोस पीक आल्याने गूळ उत्पादनाकडे शेतकर्‍यांचा ओढा वाढला आहे. मार्केट यार्डातील भुसार बाजारात दररोज अडीच ते तीन हजार बॉक्स आणि 6 ते 7 हजार डागांची आवक होत असून येत्या काही दिवसांमध्ये यामध्ये आणखी वाढ होईल, अशी माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे उपाध्यक्ष आणि गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी दिली.

राज्यातील कराड, कोल्हापूर, सांगली, बारामती, अकलूज, नीरा, केडगाव या पेठांमधून मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादनास सुरूवात झाली असून येथून मार्केट यार्डातील भुसार बाजारात गुळाची नियमित आवक होत आहे. तसेच, उत्तर प्रदेशातील हापूड, मेरठ, मुझ्झफरनगर, शामली, खतौली, अमरोह आदी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुळ उत्पादन घेण्यात येत आहे. येथून तो मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात आदी राज्यांत विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यात दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात उत्तर प्रदेशातील भैय्या व स्थानिक शेतकर्‍यांकडून गूळ तयार करण्यात येतो. यासाठी ते शेतकर्‍यांकडून 2600 ते 2700 रुपये प्रतिटनाने ऊस खरेदी करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

साधारणत: 1 टन उसापासून 120 ते 130 किलो गूळ तयार होतो़  यंदाच्या ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. रोखीचे उत्पादन असल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी गुळाचे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले आहे. गुळ लहान स्वरुपात पॅकींग करून तो बाजारात विक्रीसाठी नेण्यास सोयीस्कर ठरत असल्याने शेतकर्‍यांकडून गूळ उत्पादनास पसंती मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून उच्च व दुय्यम प्रतीच्या मालात तब्बल 800 ते 900 रुपयांची तफावत आहे़  दरम्यान, मकर संक्रांतीची चाहूल लागल्यावर गुळाच्या मागणीत आणखी वाढ होईल, असेही त्यांनी नमूद केले.