होमपेज › Pune › शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न सात जणांवर गुन्हा दाखल

शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न सात जणांवर गुन्हा दाखल

Published On: Jan 18 2018 1:46AM | Last Updated: Jan 18 2018 12:28AM

बुकमार्क करा
कामशेत : वार्ताहर

नायगावमध्ये एका शेतकर्‍याची जमीन आपल्या नावावर करण्यासाठी शेतकर्‍याचे अपहरण करून, त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याने त्याने भीतीपोटी विषारी औषध घेतल्याने कामशेत पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी शंकर विठोबा वावरे (वय 50, रा. नायगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर विठोबा वावरे यांचे नायगाव मावळ येथे गट नं. 280 मध्ये 38.25 आर इतके क्षेत्र असून, ते त्यांचा मुलगा सोमनाथ शंकर वावरे याच्या नावे आहे. सोमनाथ यास रवी वाकडकर (रा. वाकड, पुणे) आणि सचिन जगदाळे (तळेगाव दाभाडे) यांनी दारू पाजून व आमिष दाखवून दमदाटीच्या जोरावर नवनाथ ज्ञानू गायखे (रा. खामशेत मावळ) यास कुलमुखत्यार पत्र करून देण्यास भाग पाडले. तसेच, चेतन साहेबराव सोरटे (रा. तळेगाव दाभाडे) यांच्या साक्षीने खरेदीखत करून देण्यास भाग पाडले. 

यावर सोमनाथ वावरे व कांताबाई विठ्ठल पारखी यांना हे खरेदीखत मान्य नसल्याने त्यांनी खरेदीखतास हरकत नोंद होण्याकरिता नायगाव तलाठी यांच्याकडे अर्ज केला. यावरून सोमनाथ वावरेला हरकत मागे घेण्यासाठी शिवीगाळ, दमदाटी करीत सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून त्याचे अपहरण केले. त्याला मारहाण, दमदाटी करून सायंकाळी सात वाजता नायगाव येथे सोडून दिले. त्यानंतर त्याला उलट्या झाल्या व तो बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

भीतीपोटी सोमनाथने विषारी औषध घेतल्याने त्याचे वडील शंकर वावरे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निलेश दत्तात्रय तापकीर, स्वाती निलेश तापकीर (रा. चोवीस वाडी, ता. हवेली), गणेश रमेश पिंपळे (रा. खामशेत मावळ), चेतन साहेबराव सोरटे (रा. तळेगाव) रवी वाकडकर (रा. वाकड पुणे), सचिन जगदाळे (रा. तळेगाव) आणि नवनाथ ज्ञानू गायखे (रा. खामशेत मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महेंद्र वाळुंजकर करीत आहेत.