Wed, Apr 24, 2019 19:32होमपेज › Pune › फेक व्हायरल

फेक व्हायरल

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 09 2018 11:35PM-पुष्कराज दांडेकर

सोशल मीडिया हे असं माध्यम बनलंय जिथे कोणतीही गोष्ट सहज कमी कालावधीत जगभरात व्हायरल होते. सोशल मीडिया वापरणारा प्रत्येकजण व्हायरल झालेले मेसेज, व्हिडिओ आणि फोटो मोठ्या चवीने वाचतो, पाहतो. एवढेच नाहीतर आलेले मेसेज, व्हीडीओ आणि फोटो सहजपणे पुढे आपल्या मित्रांना तसेच ग्रुपवर फॉरवर्ड करतो. आबालवृद्धांना व्हाट्सअप, फेसबुक आणि ट्विटरसारख्या समाजमाध्यमांनी अक्षरश: वेड लावले आहे.

व्हाटस्अ‍ॅपवर तर आपल्याकडे एखादा मेसेज आला की, तो वाचल्यानंतर पुढे पाठविण्यात नेटीझन्स आघाडीवर आहेत. नेटीझन्सकडून समाजात घडलेल्या घटनांचा जोक्सच्या माध्यमातून समाचार घेतला जातो आहे. तर काही वेळा फेक न्यूज व्हायरल झाल्याने काही अनुचित घटनाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याचे वाईट परिणामही समाजात भोगावे लागले आहेत. इतरांनी जास्तीत जास्त व्हीडीओ, मेसेज, फोटो पाहावा आणि ते पुढे व्हायरल व्हावे हीच सध्या सोशल मीडियावरची वास्तविकता आहे. या घटनांची पडताळणी होत नसते. काही वेळा आपल्या मित्रांसाठी उपयुक्त समजून तर काही वेळा केवळ मजा म्हणून हे मेसेज फोटो व्हायरल होताना दिसताहेत. या माध्यमातून व्हायरल झालेल्या फेक मेसेजेसमुळे काही अनुुचित घटनाही घडल्या आहेत.  

मागील आठवड्यात मुलं पळविणारी टोळी आल्याचे मेसेजेस, व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे राज्यात ठिकठिकाणी जमावाने मुलं पळविणारे समजून मारहाण केली. यात काही जणांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या व्हायरल होणार्‍या मेसेजेसमध्ये फेक मेसेजेस व्हायरल होत आहेत. परंतु हे व्हायरल झालेले मेसेज खात्री न करता पुढे पाठविणे हे धोकादायक ठरले आहे. त्यामुळे पोलिस महासंचालकांना यासंदर्भात असे फेक मेसेज व्हायरल करणार्‍यांवर, अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश काढावा लागला. 

सोशलवर जोक्सद्वारे उपाहासात्मक चिमटे 

नागपूर येथे अधिवेशनाच्या कालावधीत पडलेल्या मोठ्या पावसानंतर मोठ्या प्रमाणावर या पावसावर जोक्स आणि नागपूरमधील परिस्थितीसंदर्भातील बातम्या व्हायरल झाल्या. नागपूर येथे यंदा पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. त्या कालावधीत शुक्रवार व शनिवारी पडलेल्या पावसामुळे नागपूरकरांची दैना तर झालीच. मात्र अधिवेशनाच्या कामकाजावरही याचा परिणाम झाला होता. या काळात एक दिवस अंधारात अधिवेशनाचे कामकाज चालले. तर विधान भवनात पाणी घुसले होते. यावरून नेटीझन्सनी मोठ्या प्रमाणावर जोक्सच्या माध्यमातून या घटनेचा समाचार घेतला. पुण्यातील व्हाट्सअ‍ॅप ग्रुप व फेसबुकवर यासंदर्भातील जोक्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. तर काही ठिकाणी यावर केलेली टिकाही मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली. 

पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि सध्या पाकिस्तानी राजकारणात सक्रिय असलेल्या इम्रानखानची हत्या झाल्याची बातमीही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र ही बाब खोटी असल्याचे काही वेळातच समोर आली. शासनाने मागील काही दिवसांत व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून व्हायरल झालेल्या घटनांमुळे झालेल्या मृत्यूंमुळे व्हाट्सअ‍ॅपला फेक न्यूजसंदर्भात काही सुरक्षा उपाय कऱण्यास सांगितले आहे.  त्यावर व्हाट्सअ‍ॅपकडून पर्याय शोधणे सुरु आहे.