Tue, Jul 23, 2019 01:57होमपेज › Pune › बनावट सह्या अधिकार्‍यांवर गुन्हा

बनावट सह्या अधिकार्‍यांवर गुन्हा

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 15 2017 12:30AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

कर्ज प्रकरणाची योग्य पडताळणी आणि प्रक्रिया पूर्ण न करता बनावट सह्या घेऊन 13 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रचे तत्कालीन सहय्यक महाव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि एक व्यावसायिक अशा पाच जणांवर विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ 

बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजीराव रोड शाखेचे तत्कालीन सहाय्यक महाव्यवस्थापक जे़  व्ही़  मुजुमदार, एस़  बी़  ब्रम्हे, सहाय्यक व्यवस्थापक बी़  जी़  जोशी, एस़  बी़  देशपांडे आणि व्यावसायिक रवी कुलकर्णी (रा़  संतनगर, पर्वती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़  याप्रकरणी भरत बाबुराव भुजबळ (वय 51, रा़ नाविन्य सोसायटी, वारजे) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़      

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुजबळ यांची युनिटेक ही कंपनी आहे. तर रवी कुलकर्णी यांची फ्युजन कंट्रोल ही फर्म  आहे. रवी कुलकर्णी यांचा ट्रेडिंगचा व्यवसाय आहे़  दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. रवी कुलकर्णी यांनी महाराष्ट्र बँकेच्या बाजीराव रोड शाखेतून साडेतीन लाख रुपयांचे सीसी लोन घेतले होते़  या कर्जाला भरत भुजबळ हे जामीनदार होते़  त्यानंतर रवी कुलकर्णी यांचे 13 कोटी  रुपयांचे कर्ज थकले असून तुम्ही जामीनदार असल्याचे 30 ऑक्टोंबर 2010 रोजी बँकेकडून भुजबळ यांना कळविण्यात आले होते. यानंतर भुजबळ यांनी रवी कुलकर्णींना याबाबत विचारणा केली. तेव्हा मी बँकेचे कर्ज फेडतो, तू काळजी करू नकोस असे आश्वासन रवी कुलकर्णी यांनी त्यांना दिले़  भुजबळ यांनी बँकेतून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

परंतु त्यांना काहीही माहिती मिळू शकली नाही़  त्यानंतर त्यांना डेब्ट ट्रिब्युनल लवादाची 6 सप्टेंबर 2017 रोजी नोटीस आली़  त्यात रवी कुलकर्णी यांच्या कर्जास तुम्ही जामीन दिला असून जामीनदार म्हणून तुमची तळेगाव ढमढेरे येथील वडिलोपार्जित आणि तुमच्या नावे असलेल्या इतर मालमत्तेचा कोणताही व्यवहार करू नये, असे त्यात म्हटले आहे़  भुजबळ यांनी लवादातून कागदपत्रे मागविली. ते एका कर्ज प्रकरणात जामीन होते. मात्र, आलेल्या कागदपत्रांतून त्यांना असे दिसून आले की, तीन वेगवेगळ्या कर्ज प्रकरणात जामीनदार म्हणून त्यांच्या बनावट सह्या करण्यात आल्या़  रवी कुलकर्णी याने बँकेच्या अधिकार्‍यांशी संगनमत करुन विश्वासघात केला. तसेच बँकेच्या अधिकार्‍यांनी जामीनदाराची खात्री न करता तसेच प्रकरणाची पडताळणी आणि योग्य प्रक्रिया न करता परस्पर कर्ज मंजूर केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे अधिक तपास करीत आहेत़