Fri, Jul 19, 2019 05:14होमपेज › Pune › घर हडपण्यासाठी घटस्फोट अन् लग्नही बनावट!

घर हडपण्यासाठी घटस्फोट अन् लग्नही बनावट!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

दोन वकिलांच्या मदतीने पहिल्या पतीसोबत घटस्फोटाची बनावट कागदपत्र बनवली. त्यानंतर  64 वर्षीय ज्येष्ठाला लग्नाचे अमिष दाखवून त्याच्यासोबत मॅरेज ब्युरोमध्ये चक्क लग्नही केलं आणि नंतर पहिला पती आणि दोन मुलांकडून ज्येष्ठाला जबर मारहाण करून घरातून हाकलले. हे कोणत्या चित्रपटातील कथानक नव्हे; तर पुण्यात घडलेली एक सत्य घटना आहे.  घर लाटण्यासाठी 36 वर्षीय महिला, तिचा पती, वकील, झेरॉक्स सेंटर आणि मॅरेज ब्युरो मालकांनी  मिळून केलेल्या फसवणुकीने पोलिसही काही वेळ चक्रावून गेले होते.  याप्रकरणी सहा जणांवर सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहकारनगरमधील धक्कादायक प्रकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ नागरिक असून, एका विद्यालयातून निवृत्त झाले आहेत. त्यांचा मुलगा परदेशात नोकरी करतो. ते पुण्यात एकटेच असतात. त्यांची धनकवडी भागात इमारत असून, त्याठिकाणी काही त्यांनी भाडेकरू ठेवले आहेत. ते राहण्यास मूळगावी असतात. अधून-मधून पुण्यात येतात. दरम्यान आरोपी महिलेचा विवाह झालेला असून, ती दोन मुलांसह पतीसोबत मांगडेवाडी भागात राहते. एका व्याखानासाठी फिर्यादी गेल्यानंतर त्यांची दुसर्‍या एका ज्येष्ठासोबत ओळख झाली. त्यावेळी त्यांनी पुण्यात एकटाच असल्याचे  त्यांना सांगितले. यावेळी दुसरे लग्न करण्याचे फिर्यांदींना सुचवले.  

तसेच, आरोपी महिलेचा नवरा खूप मारहाण करतो व त्रास देतो. त्यामुळे ती घटस्फोट घेणार आहे, असे सांगून तिचा क्रमांक फिर्यांदीना दिला. फिर्यादींनी तिच्याशी संपर्क केला. त्यावेळी महिलेने पतीसोबत पटत नसून, त्याच्यापासून घटस्फोट घेणार असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर फिर्यादी महिलेच्या घरी गेले. त्याठिकाणी त्यांची बोलणी झाली. तसेच, व्यवस्थित सांभाळ करणार असाल, तर लग्न करते, असे आरोपी महिला म्हणाली.  फिर्यादी एकटे असल्याने त्यांनीही लग्नाला होकार दिला. 

काही दिवसांनी महिलेने फिर्यादींना घरी बोलावले. त्यावेळी महिला व तिचा पती दोघेही घरी होते. फिर्यादींसमोर तिने पतीला आपले पटत नसल्याने मी घटस्फोट घेऊन तक्रारदारांसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी पतीनेही दोघांच्या लग्नाला होकार दिला. घटस्फोटपासून ते फिर्यादींसोबत लग्नपर्यंतचे सर्व काम ओळखीतील वकील करून देतील, असे सांगितले आणि वकिलाच्या ऑफिसमध्ये नेले. घटस्फोट व लग्नाची माहिती दिली. त्यानंतर संबंधित वकिलाने नोटरी करून देणारा तसेच मॅरेज ब्युरोच्या मालकाला बोलावले. घटस्फोट आणि लग्नाची अशी मिळून 75 हजार रुपये फी सांगितली. पती-पत्नीने फिर्यादींकडूनच 45 हजार रुपये घेऊन त्यांना दिले.

त्यानंतर पहिल्या पतीपासून घटस्फोट झाल्याचे कागदपत्र बनविले. त्यानंतर फिर्यादी व महिलेला मॅजेर ब्युरो येथे नेले. त्याठिकाणी त्यांचा विधी करून लग्न लावण्यात आले. लग्नाचे फोटोही काढले. त्याचवेळी फिर्यादींच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी तेथे येऊन फिर्यादींना तेथून नेले. त्यावेळी आरोपींनी नातेवाईकांना शिवीगाळ केली.

त्यानंतर काही दिवसांनी फिर्यादी महिलेच्या मांगडेवाडीतील घरी गेले. तेथे महिला पहिल्या पती व दोन मुलांसोबत राहत होती. फिर्यादीही काही दिवस त्यांच्यासोबत राहिले. त्यावेळी महिलेने फिर्यादींकडून त्यांच्या धनकवडी येथील फ्लॅटचा पत्ता व भाडेकरुचा मोबाईल क्रमांक घेतला. तसेच, त्यांना फोन करून खोली सोडण्यास सांगितले. त्यानंतर तेथे जाऊन एका फ्लॅटला कुलूप लावून फ्लॅटचा ताबा घेतला. काही दिवसांनी परत जाऊन दोन्ही भाडेकरूंना खोली सोडण्यास भाग पाडून फ्लॅटचा ताबा घेतला.

फ्लॅटच्या भिंतीची तोडफोड केली. त्यानंतर महिला पहिल्या पतीला व मुलांना घेऊन फिर्यादींच्या इमारतीत राहण्यास आली. फिर्यादींनाही तेथे राहण्यास आणले. त्यांच्याकडूनच 20 हजार घेऊन किराणा भरला. तसेच, त्यांना मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्याच विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दिली. त्यामुळे भीती पोटी फिर्यादी हे मुळगावी निघून गेलो, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना हा प्रकार समजला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार देण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, त्यांनी तक्रार दिली.


  •