Sat, Aug 24, 2019 20:13होमपेज › Pune › पंतप्रधान आवास योजनांची फेरनिविदाच उचित

पंतप्रधान आवास योजनांची फेरनिविदाच उचित

Published On: Aug 22 2018 1:24AM | Last Updated: Aug 21 2018 10:36PMपिंपरी : जयंत जाधव

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चर्‍होली, रावेत व बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्पांच्या बांधकाम दर दुप्पट आहे. यामध्ये सुमारे दीडशे कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. गरिबांच्या घरांच्या नावाखाली स्वत:ची घरे भरण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या अगोदरही या प्रकल्पांबाबत विरोधी पक्षांनी जोरदार टीका केलेली आहे. बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पांच्या निविदेत फेरप्रस्ताव मागविल्यावर त्यामध्ये सुमारे साडेअकरा कोटी रुपयांची महापालिकेची बचत झाली. यावरुनही या प्रकल्पांच्या निविदा किती मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या ते स्पष्ट होते. त्यामुळे या पंतप्रधान आवास योजनेच्या तीनही निविदा पुन्हा मागवाव्यात, अशी जनसामान्यांची इच्छा आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पालिका शहरातील 10 ठिकाणी गृहप्रकल्प उभारणार आहे. चर्‍होलीतील गृहप्रकल्पातील 1 हजार 442 सदनिकांसाठी 132 कोटी 50 लाख खर्च येणार आहे. बांधकामांसाठी ठेकेदारांला प्रति स्केअर फूट दर 2 हजार 846 रुपये दर देण्यात आला आहे. रावेत गृहप्रकल्पातील 934 सदनिकांसाठी 88 कोटी खर्च आहे. ठेकेदारांला प्रति स्केअर फूट दर 2 हजार 977 रुपये आहे. तर, बोर्‍हाडेवाडी गृहप्रकल्पातील 1 हजार 288 सदनिकांसाठी 123 कोटी 78 लाख खर्च आहे. त्याचा बांधकामांचा प्रति स्केअर फूट दर 2 हजार 977 रुपये आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात बांधकामाचा बाजारभावाप्रमाणे प्रति स्केअर फूट दर 1 हजार 400 ते 1 हजार 500 रुपये आहे. या दरामध्ये सर्वात उत्तम प्रकारे बांधकाम होऊ शकते. मात्र, चर्‍होली, रावेत व बोर्‍हाडेवाडी प्रकल्पांना प्रति स्केअर फुटांपेक्षा जास्त दर दिला गेला आहे. त्यामुळे या 3 प्रकल्पात अंदाजे दीडशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप आ. चाबुकस्वार यांनी केला आहे. आ. चाबुकस्वार यांच्या या बोलण्यात तथ्य आहे. 

गरिबांच्या घरांच्या नावाखाली स्वत:ची घरे भरण्याचा हा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे. या तीन ही प्रकल्पाची चौकशी करून चर्‍होली, रावेत व बोर्‍हाडेवाडी या 3 प्रकल्पांच्या निविदा रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी  मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच, नगर विकास मंत्री रणजित पाटील यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली आहे. आ. चाबुकस्वार हे स्वत: वकील व अभ्यासू लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना महापालिका योजनांचाही अभ्यास आहे. त्यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून पाच वेळा निवडून आलले आहेत. व त्यांनी झोपडपट्टीवासीयांचे योग्य प्रकारे प्रतिनिधीत्व केलेले आहे. उपमहापौरपदही त्यांनी भूषविले आहे. त्यामुळे महापालिकेत कसा सावळा गोंधळ होतो हे त्यांना नेमके माहीत आहे.  महापालिकेत अनेक प्रकल्पात वाढीव दर गेल्याचे या पूर्वीही सिद्ध झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान आवास योजनेच्या बोर्‍हाडेवाडी प्रकल्पात भाजपचे शहराध्यक्ष आ. लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांना दिलेल्या आदेशानुसार फेरप्रस्ताव मागविण्यात आला. या फेरप्रस्तावात केवळ ‘वॉल पुट्टीत’ बदल केल्याने महापालिकेचे सुमारे साडेअकरा कोटी रुपयांची बचत झाली. हेही आपण नाकारु शकत नाही. महापालिकेच्या अशा प्रकल्पात बारकाईने लक्ष दिल्यास नक्कीच शेकडो कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे आ. चाबुकस्वार यांनी केलेली मागणी अभ्यासपूर्ण व योग्यच आहे. त्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मकपणे विचार करावा व ते करतील, अशीच शहरातील नागरिकांची अपेक्षा आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपानेही विरोधकांचे हे आरोप सकारात्मक पद्धतीने घेणे गरजेचे आहे.   

गरिबांना कमी किमतीत घरे मिळावित 

पंतप्रधान आवास योजनेच्या निविदा रद्द करा अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान आवास योजनेस नाहक राजकारण म्हणून विरोध करू नये, अशी मागणी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीत कष्टकरी कामगार राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यांतून कामगार उपजीविकेसाठी, व्यावसायासाठी आलेले आहेत. त्यांना त्यांचे हक्काचे घर मिळावे, ही माफक त्यांची अपेक्षा रास्त आहे. त्यांना महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत घर मिळावे, ही कोणत्याही सामान्य नागरिकांची अपेक्षा असणे योग्यच आहे. परंतु, या गरिबांना घरे देताना कमी किमतीत देता आली तर ते केव्हाही चांगलेच आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने या तीनही निविदांबाबत फेरनिविदा काढणेच उचित ठरणार आहे.