Sun, May 26, 2019 20:43होमपेज › Pune › फेसबुकची मैत्री आजीबाईंना पडली २४ लाखांना

फेसबुकची मैत्री आजीबाईंना पडली २४ लाखांना

Published On: Jun 10 2018 1:49AM | Last Updated: Jun 10 2018 1:31AMपुणे : प्रतिनिधी

बाणेर परिसरात राहणार्‍या आजींना फेसबुकवर केवळ तीन महिन्यांपूर्वी झालेली मैत्री चांगलीच महागात पडली आहे. कारण  परदेशतून गिफ्ट पाठविल्याचे सांगत तब्बल चोवीस लाख 16 हजार रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे बक्षीस मिळण्याच्या अपेक्षेने पाच दिवसांमध्ये आजीबाईंनी ही रक्कम बँक खात्यात भरली. याप्रकरणी फ्रेंडी नेल्सन नावाच्या व्यक्तीवर चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 69 वर्षीय फिर्यादी या बाणेर परिसरात राहण्यास आहेत. त्यांचे फेसबुकवर खाते आहे. दरम्यान तीन महिन्यांपूर्वी त्यांच्या फेसबुकवर फ्रेंडी नेल्सन नावाची फे्रंड रिक्‍वेस्ट आली होती. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात फेसबुकवरून चॅटिंगद्वारे बोलणे सुरू झाले. परंतु, मध्येच त्या व्यक्तीने त्यांच्याशी बोलणे बंद केले. काही दिवसांनी फिर्यादीचा वाढदिवस होता. त्यादिवशी मित्राने फेसबुकवर आजींना शुभेच्छा दिल्या. तीन दिवसांनी फिर्यादींच्या व्हॉट्सअपवर एसएमसकरून मैत्री करण्याची विनंती केली. त्यानंतर त्यांच्या नियमित बोलणे सुरू झाले. तो डॉक्टर असल्याचे सांगत असे. एकेदिवशी डॉक्टरांच्या आंतरराष्ट्रीय संमेलनासाठी माझी निवड झाली. त्याठिकाणी जाणार असून, तेथून आल्यानंतर माझे प्रमोशन होणार आहे. संमेलनाला जाण्यापूर्वी तुमच्यासाठी गिफ्ट घेतले असल्याचे  मित्राने आजींना सांगितले.  ते पाठवायचे असल्याचे सांगत त्यांच्याकडून  पत्ता मिळवला. त्यांना गिफ्टही पाठविल्याचे सांगितले. 

त्यानंतर गेल्या महिन्यात दिल्ली येथील एका कुरिअर कंपनीतून फिर्यादींना फोन आला. तसेच, यु.के.मधून गिफ्ट आले असून, त्यासाठी प्रथम 32 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी ते भरले.  पुन्हा 97 हजार रुपये भरले. त्यानंतरही फिर्यादींना आलेल्या गिफ्टमध्ये दागिने, मोठ्या प्रमाणात पैसे असल्याचे सांगत  त्यांना 22 लाख 86 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फिर्यादींनी एकूण 24 लाख 16 हजार रुपये भरूणही त्यांना गिफ्ट मिळाले नाही. तसेच, आणखी पैसे भरावे लागतील असे सांगितले. त्यावेळी त्यांनी नातेवाईकांकडे पैसे मागितले. त्यावेळी त्यांनी आजींना  हे खोटे असून, फेसबुक मित्र फसवत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावेळी त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अधिक तपास सहायक निरीक्षक ढेेंगे हे करत आहेत.