Mon, Apr 22, 2019 06:28होमपेज › Pune › महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात 

महिलेला फेसबुकवरील मैत्री महागात 

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी

इंजिनिअरच्या उच्चशिक्षित पत्नीला फेसबुकवरील मैत्री चांगलीच महागात पडली असून परदेशी मित्राने गिफ्ट पाठविल्याचे सांगून ते सोडवून घेण्यासाठी तब्बल साडेसहा लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. इंग्लंडच्या मित्राशी मैत्री झाल्यानंतर 32 लाख सोडवून घेण्यासाठी दाम्पत्याने हे पैसे भरले होते.  परंतु, त्यांना काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी नर्‍हे भागात राहणार्‍या 40 वर्षीय व्यक्तीने सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, महिलेसह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मेकॅनिकल इंजिनिअर असून, ते एका खासगी कंपनीत नोकरी करत आहेत. तर, त्यांच्या पत्नीही उच्चशिक्षित असून, त्याही खासगी ठिकाणी नोकरी करतात. दरम्यान 2017 मध्ये फिर्यादींच्या पत्नीला त्यांच्या फेसबुक खात्यावर इंग्लंड येथील अ‍ॅलेक्स नावाच्या व्यक्तीने फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविली होती. ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यात बोलणे झाले. त्यामुळे दोघांची ओळख झाली आणि ते मित्र बनले. काही दिवसांनी त्याने महिलेला इंग्लंडमधून गिफ्ट पाठवतो,  ते सोडून घ्या, असे सांगितले. त्यानुसार, त्याने 32 लाख रुपयांचे पौंड पाठविल्याचे सांगितले. परंतु, ते भारतात चालत नसून, त्यामुळे ते सोडवून घ्यावे लागतील. त्यानंतर फिर्यादींना तुमचे गिफ्ट आले असून, ते सीमा शुल्क विभागाने पकडले असल्याबाबात एका व्यक्‍तीने फोन केला. 

तसेच, पाठविण्यात आलेले 32 लाखाचे पौैंड भारतीय चलनात करण्यासाठी, रजिस्ट्रेशन फी आणि टॅक्स व दंड म्हणून वेगवेगळ्या खात्यावर एकूण 6 लाख 47 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, फिर्यादींनी त्यांच्या खात्यावरून 2 लाख आणि त्यांच्या पत्नीने 4 लाख 47 हजार रुपये भरले. परंतु, त्यानंतरही त्यांना 32 लाखाचे पौंड मिळाले नाही. त्यानंतरही त्यांना पैसे भरण्यास सांगितले गेले. त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत पुणे पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली. पोलिसांनी याची प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी फसवणूक झाल्याचे समोर आले. त्यानंतर याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) बबन खोदडे हे करत आहेत.