Sat, Nov 17, 2018 12:17होमपेज › Pune › फेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला महागात

फेसबुकवरील मैत्री शिक्षिकेला महागात

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 1:27AMपुणे : प्रतिनिधी 

फेसबुकवर मैत्री करणे येरवडा येथील शिक्षिकेला महागात पडले आहे. यू. के. मधून तिच्यासाठी भेटवस्तू पाठविल्याचे सांगत पार्सल घेण्यासाठी, पार्सलमध्ये सोने व पाऊंड असल्याने त्याची पेनल्टी व अन्य वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे खात्यावर भरण्यास लावत तिघांनी तीन लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एका महिलेसह तीन जणांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर 32 वर्षीय शिक्षिकेने यासंदर्भात फिर्याद दिली आहे. 

फिर्यादी या येरवडा परिसरात शिक्षिका आहेत. 19 सप्टेंबर 2016 रोजी त्यांना फेसबुकवरील त्यांच्या खात्यात एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती स्वीकारली. त्यानंतर ती व्यक्ती त्यांच्याशी वारंवार फेसबुकवर चॅटिंग करू लागली. त्यांच्यात मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. नंतर ते व्हॉट्स अ‍ॅपवर एकमेकांशी बोलू लागले. यादरम्यान त्यांना यू. के. मधून भेटवस्तू पाठवली असल्याचे सांगितले. त्यांना भेटवस्तूचे पार्सल घेण्यासाठी प्रथम 27  हजार रुपये खात्यावर भरण्यास सांगितले. महिलेने त्यांना एका व्यक्तीचा खाते क्रमांक दिला. त्यानंतर त्यामध्ये त्यांनी पैसे भरले. मात्र, पुन्हा फोन आला आणि पार्सलमध्ये सोने असल्याने त्याला पेनल्टी लागली असल्याचे सांगत पुन्हा 83 हजार 200 रुपये भरण्यास लावले.

काही दिवसांनी फोन करून पुन्हा पार्सलमध्ये पौंड आहेत. त्यालाही पेनल्टी लागली असल्याचे सांगत 1 लाख 92 हजार रुपये भरण्यास लावले. अशाप्रकारे त्यांना तीन लाख 2 हजार 200 रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांना फोन करून पार्सलबाबत विचारणा करण्यासाठी फोन करून संपर्क करण्यास सुरुवात केली. मात्र तिघांचेही मोबाईल बंद करून ठेवण्यात आले होते. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे)अशोक कदम करत आहेत.

Tags : Pune, Pimpri, Facebook, friendship, costs