Tue, Jul 16, 2019 09:36होमपेज › Pune › अनुपम खेर यांच्यासमोर विद्यार्थ्यांचे गार्‍हाणे

अनुपम खेर यांच्यासमोर विद्यार्थ्यांचे गार्‍हाणे

Published On: Jul 12 2018 1:42AM | Last Updated: Jul 12 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय)चे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी (दि. 11) एफटीआयआयला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेतील विविध कामांची पाहणी केली. त्यावेळी संस्थेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्यासमोर गार्‍हाणे मांडले.  

यावेळी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कॅन्थोलादेखील उपस्थित होते. अनुपम खेर यांनी संस्थेला भेट देत संस्थेत विद्यार्थ्यांसाठी नव्याने सुरू झालेले उपाहारगृह, संस्थेसाठी शासनाने उपलब्ध करून दिलेली गाडी यासह विविध कामांची पाहणी केली. गेल्या दोन वर्षापासून एफटीआयआय संस्था वादग्रस्त ठरते आहे. संस्थेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यासाठी, या दोन वर्षात विद्यार्थ्यांनी आंदोलनेसुद्धा केली. अनुपम खेर यांच्या भेटी यादरम्यान संस्थेतील कॅमेरा, कला दिग्दर्शन, साऊंड या शाखेमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी त्यांना गाठत तक्रारीचा पाचपानी अर्ज सादर केला.

अभ्यासक्रम उशिरा कळतो

सिनेमॅटोग्राफी शाखेत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाबाबत प्रश्‍न उपस्थित केले. तक्रार अर्जामध्ये केलेल्या तक्रारीमध्ये, अभ्यास वर्ग सुरू होण्याची वेळ आली असताना देखील अभ्यासक्रम हातात मिळत नाही. त्यामुळे, अभ्यासाचे नियोजन करता येत आही. पूर्वीच्या वार्षिक अभ्यासक्रमात बदल करत संस्थेने तो सहामाही केला. अभ्यासक्रम वार्षिक असल्यामुळे पूर्वी विद्यार्थी पंधरा ते वीस प्रात्यक्षिक करू शकत होते. आता मात्र पाच ते सात प्रात्यक्षिके होतात, अशा अनेक तक्रारींची नोंद आहे.