Fri, Apr 26, 2019 15:18होमपेज › Pune › ‘एफआरपी’ साखर दराशी निगडित असावी

‘एफआरपी’ साखर दराशी निगडित असावी

Published On: Dec 30 2017 1:30AM | Last Updated: Dec 30 2017 1:16AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

साखरेचे भाव पडल्यामुळे कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये (अपुरा दुरावा) आलेले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने एफआरपीची रक्कम ही साखरेच्या दराशी निगडित करावी. त्याचबरोबर साखरेचा मुबलक साठा असल्याने सुमारे 25 ते 30 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी आदी महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात पुढील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून प्रश्‍न सोडविण्याचे साकडे घालण्याचा निर्णय शुक्रवारी साखर संकुल येथे झालेल्या सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत घेण्यात आला.

साखरेच्या घसरत्या भावामुळे निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी राज्यातील सहकारी व खासगी कारखान्यांच्या सुमारे 85 प्रतिनिधींची बैठक राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, मोहनराव कदम, बबनराव शिंदे, संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्यासह साखर कारखान्यांचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक उपस्थित  होते.

बैठकीनंतर साखर संघाचे संजय खताळ म्हणाले, केंद्र सरकारने साखरेचा सुमारे 20 लाख टनांचा राखीव साठा (बफर स्टॉक) तत्काळ करावा. राज्य सरकारच्या ऊस वाहतुकीच्या अंतरानुसार वाहतूक दरास तत्काळ स्थगिती द्यावी. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार सभासद अथवा बिगर सभासद ऊस उत्पादक असा भेदभाव कारखान्यांना करता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. त्यानुसार पूर्वीच्या दरानेच ऊस तोडणी व वाहतूक खर्चाची कपात करण्यास परवानगी द्यावी.

राज्य बँकेने उसाला प्रतिटनास 1885 रुपये मूल्यांकन केलेले आहे, तर एफआरपीचा दर साडेनऊ टक्के उतार्‍यास 2550 रुपये आहे. उत्पादन खर्च 3450 रुपये असल्याने कारखाने शॉर्टमार्जिनमध्ये आले आहेत. त्यामुळे राज्य बँकेकडील साखर मूल्यांकन वाढविण्यासाठी शासनाने मदत करावी. राज्य सरकारने कारखान्यांकडून स्वनिर्मित होत असलेल्या वीजनिर्मिती वापरासाठी प्रतियुनिट 1 रुपया 20 पैसे शुल्क लावले आहे. तेसुद्धा तत्काळ रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात येणार असल्याचेही खताळ यांनी सांगितले.