Wed, Mar 27, 2019 01:58होमपेज › Pune › साखर मुल्यांकन घटविल्याने ‘एफआरपी’चा पेच

साखर मुल्यांकन घटविल्याने ‘एफआरपी’चा पेच

Published On: Apr 15 2018 1:27AM | Last Updated: Apr 15 2018 1:07AMपुणे : प्रतिनिधी

राज्य सहकारी बँकेने साखर मूल्यांकन क्विंटलला 2920 रुपयांवरुन कमी करीत 2800 रुपये म्हणजे क्विंटलला 120 रुपयांनी कमी केले आहे. तर प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या उसाची रक्कम देण्यासाठी प्रतिटनास 1730 रुपयांवरून कपात करीत 1630 रुपये म्हणजेच 100 रुपये आणखी कमी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाची रास्त आणि किफायशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम देण्यासाठी कारखान्यांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे.

बाजारपेठेतील साखरेची भावपातळी पाहून राज्य बँकेंकडून साखर मुल्यांकनात बदल केला जातो. मागील पंधरा दिवसात साखर निविदा क्विंटलला तीनशे रुपयांनी गडगडल्या आहेत. त्यामुळे मुल्यांकन कमी होणे अपेक्षित मानले जात होते. राज्य बँकेंच्या सुधारित परीपत्रकान्वये सुधारित साखर मूल्यांकन क्विंटलला 2800 रुपये असून, उचल दर 2380 रुपये इतका निर्धारित करण्यात आलेला आहे. त्यामधून 500 रुपये बँक कर्ज वसुली करण्यात येईल; तसेच प्रक्रिया खर्चाचे 250 रुपये कपात करून प्रत्यक्षात उसाला टनास 1630 रुपये उचल कारखान्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

केंद्राचा साडे नऊ टक्के उतार्‍यासाठी 2550 रुपये एफआरपीचा दर आहे. तर त्यापुढील एका टक्क्यास 267 रुपये दर आहे. सध्या साखरेच्या निविदा 2650 रुपयांपर्यंत खाली आलेल्या आहेत. त्यामुळे साखर पोत्यावरील तारण कर्जाचा विचार करता 1630 रुपये आणि निविदांचा घटलेला दर पाहता किमान 1020 रुपये कमी पडत आहेत. म्हणजेच एफआरपीची रक्कम देण्यासाठी कारखान्यांचा अपुरा दुरावा (शॉर्ट मार्जिन) आणखी वाढले आहे. यातून कारखाने कसा मार्ग काढणार असा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. त्यामुळे एफआरपीच्या रकमेसाठी साखर कारखाने, साखर आयुक्तालय शेतकरी संघटनांच्या रडारवर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Tags : Pune, FRP, fixes, due, reduction,  sugar, valuation