Sun, Aug 18, 2019 21:30होमपेज › Pune › बारामतीत आजी-माजी कृषी अधिकार्‍यांवर गुन्हा

बारामतीत आजी-माजी कृषी अधिकार्‍यांवर गुन्हा

Published On: May 26 2018 1:52AM | Last Updated: May 26 2018 12:55AMबारामती ः प्रतिनिधी

बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत ठेकेदाराला काम दिल्याप्रकरणी बारामतीतील कृषी विभागाच्या पाच जणांसह ठेकेदार, अशा सहा जणांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाच्या चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद परजणे, सध्याचे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संजय पतंगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. बारामतीचे तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद पर्वतराव परजणे (वय अंदाजे 60), सध्याचे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार नारायण बरकडे (वय 50), मंडल कृषी अधिकारी पोपट शंकर ठोंबरे (वय 57), कृषी पर्यवेक्षक शाहुराज हरिश्‍चंद्र मोरे (वय 43), कृषी सहाय्यक विजय किसन चांदगुडे (वय 55) यांच्यासह शिवाजी एकनाथ भोंडवे (वय 43, रा. काळखैरेवाडी, ता. बारामती) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिवनेरी कॉन्ट्रॅक्टरचे प्रोपरायटर शिवाजी उत्तरेश्‍वर तळेकर (रा. नवी सांगवी, पुणे) यांनी 11 जुलै 2017 रोजी तक्रार दाखल केली होती. बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथील गट क्रमांक 6 व  7 मधील सिमेंट नाला कामामध्ये व निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची त्यांची तक्रार होती.  एसीबीने या तक्रारीच्या अनुषंगाने तपास केला असता प्राथमिक चौकशीत कृषी विभागाच्या पाच जणांसह ठेकेदार दोषी आढळला. खासदार निधीतील हे काम होते. त्याची निविदा प्रक्रिया राबविताना कृषी विभागाच्या या अधिकारी-कर्मचार्‍यांनी दिलेल्या अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून पूर्वी दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरने मुदतीत काम पूर्ण केले नाही, म्हणून भोंडवे यांच्या मे. सिद्धांत कन्स्ट्रक्शन यांना हे काम दिले. परंतु भोंडवे यांनी जळगावातील गट क्रमांक 6 च्या कामासाठी निविदाच भरली नव्हती. तसेच गट क्रमांक सातमधील निविदेत ते तिसर्‍या स्थानी होते.

पहिल्या स्थानावरील ठेकेदाराचा अधिकार्‍यांनी अधिकार नसताना काळ्या यादीत समावेश केला. त्यानंतर नियमानुसार दुसर्‍या स्थानावरील व्यक्तीला काम मिळणे गरजेचे असताना बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करत, त्यांनी ही दोन्ही कामे भोंडवे यांना देत भादंवि कलम 109 प्रमाणे अपराध केला. शिवाय कामे देताना सिद्धांत कन्स्ट्रक्शनकडून अनामत रकमा व अतिरिक्त सुरक्षा ठेवही भरून घेतली नाही. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 13 सह, भादंवि कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.  आरोपींपैकी संतोषकुमार बरकडे, पोपट ठोंबरे, शाहुराज मोरे, विजय चांदगुडे या चौघांना अटक करण्यात आली आहे. एसीबीचे अधीक्षक संदीप दिवाण, अप्पर पोलिस अधीक्षक दिलीप बोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली उपधीक्षक दत्तात्रय भापकर अधिक तपास करत आहेत. 

एसीबीने घेतले विशेष परिश्रम

या गुन्ह्यात एसीबीने विशेष परिश्रम घेतले. गेली महिनाभर या आरोपींवर पाळत ठेवली जात होती. चौघे एकत्र येण्याची वाट एसीबीला पाहावी लागली. अखेर शुक्रवारी (दि. 25) सायंकाळी पाचच्या सुमारास बारामती पंचायत समितीजवळ ते एकत्र आले असताना त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

कृषी विभाग अनेक दिवस रडारवर

बारामतीचे तालुका कृषी अधिकारी संतोषकुमार बरकडे यांच्याबद्दल अनेक तक्रारी होत्या. जलयुक्त शिवार योजनेची कामे ठरावीक ठेकेदारांनाच देणे व अन्य स्वरूपाच्या तक्रारी त्यांच्या विरोधात सातत्याने होत होत्या. त्यांच्यासह कृषी विभागाच्या अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे. दरम्यान, गोविंद परजणे हे आता सेवानिवृत्त झाले असले तरी, त्यांच्या कार्यकाळात हा गुन्हा घडल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.