Wed, Mar 20, 2019 23:23होमपेज › Pune › ज्येष्ठ नागरिक कक्षाला ‘फिक्की’चा स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार

ज्येष्ठ नागरिक कक्षाला ‘फिक्की’चा स्मार्ट पोलिसिंग पुरस्कार

Published On: Jun 05 2018 1:28AM | Last Updated: Jun 05 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाला ज्येष्ठांची सुरक्षितता तसेच उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल फिक्कीकडून देण्यात येणारा ‘स्मार्ट पोलिसिंग 2018’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री विजय गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला.  गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या पोलिस निरीक्षक स्वाती थोरात व पोलिस नाईक पूनम बारस्कर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शहरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. तर, एकटे तसेच ज्येष्ठ दाम्पत्यही मोठ्या प्रमाणात राहतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न उपस्थित केले जात होते. गेल्या वर्षात पुणे पोलिसांनी ज्येष्ठांच्या समस्यांसाठी तसेच त्यांना अडचणीच्या काळात तत्काळ मदत मिळावी यासाठी ज्येष्ठ नागरिक कक्षाची स्थापन केली होती. त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षात पोलिस निरीक्षक स्वाती थोरात, जयश्री जाधव, रिना सस्वामी, आशा गायकवाड, गजानन सोनवलकर यांच्यासह इतर कर्मचारी काम करतात. शहरातील दहा हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची नोेंदणी करण्यात आलेली आहे. त्यांना पोलिसांकडून ओळख पत्रही देण्यात आलेले आहेत. तसेच, काही ज्येष्ठांना घरपोच सेवाही पुरवली जाते. 

दरम्यान नवी दिल्ली फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (फिक्की) या संस्थेमार्फत दरवर्षी देशभरातील पोलिस दलात विविध विभागात उत्कृष्ट कामगिरी तसेच, एखाद्या गोष्टीसाठी पोलिसांनी कामासाठी केलेले वेगळेपण व त्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांबद्दल पुरस्कार देण्यात येतो. संस्थेकडून यंदाच्या पुरस्कारासाठी देशभरातील पोलिसांनी त्यांनी केलेल्या विविध कामे व नावीन्यपूर्ण उपक्रमांबाबत माहिती मागविली होती. त्यानुसार, यंदा ‘एल्डर्ली सेफ्टी’ या विषयाअंतर्गत ज्येष्ठांसाठी पोलिसांकडून करण्यात आलेले विशेष योगदान, त्यांच्या सुरक्षिततेसाठी काम तसेच इतर माहिती मागविली होती. देशभरातून यासाठी एकूण  211 प्रस्ताव आले होते. पुणे पोलिसांच्याही ज्येष्ठ नागरिक कक्षाने प्रस्ताव पाठविला होता. त्यातून पुणे पोलिसांच्या ज्येष्ठ नागरिक कक्षाची निवड करण्यात आली आहे.