Sat, Apr 20, 2019 09:54होमपेज › Pune › ‘एफडीए’ झाला सुस्त, हॉटेल झाले मस्त

‘एफडीए’ झाला सुस्त, हॉटेल झाले मस्त

Published On: Dec 31 2017 1:47AM | Last Updated: Dec 31 2017 12:39AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकजण कुटुंबांसह पार्टी अथवा सेलिब्रेशन करण्यासाठी घराबाहेर पडतात. शहरातील उत्तमोत्तम सेवा देणार्‍या हॉटेल्सची निवड करतात; मात्र या हॉटेल्समध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे व निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. दरवर्षी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) हॉटेल्सचालकांना स्वच्छतेविषयी सूचना देत असतात; परंतु यंदा एफडीएच्या ढिसाळ नियोजनामुळे केवळ हॉटेलचालकांचाच फायदा होणार आहे; तर नागरिकांची सेलिब्रेशनच्या नावाखाली लूट होण्याची शक्यता आहे. 

शहरात हजारो हॉटेल्समध्ये नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त पार्ट्यांचे आयोजन केेले जाते. यामध्ये विविध खाद्यपदार्थांचा समावेश असून, हॉटेल्समध्ये येणारी गर्दी पाहता हॉटेलचालकांनी अनेक पदार्थ पूर्वीच तयार करून ठेवले आहेत. या तयार पदार्थांमुळे पार्टीत येणार्‍या कुटुंबांचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. यावर नियंत्रण ठेवणारी एफडीए (अन्न विभाग) यंत्रणेने लक्ष ठेवणे आवशक आहे; मात्र तसे होताना दिसत नाही. 

हॉटेल्स चालवण्याचा परवाना देताना त्यांना विविध अटी व नियमांची पूर्तता करावी लागते. एकदाचा परवाना मिळला की नियमांची ऐशीतैशी केली जाते. यात एफडीएचा अधिकार्‍यांचेही अप्रत्यक्षपणे सहकार्य लाभते. मुळात एफडीएने दर तीन महिन्यांनी परवाना दिलेल्या आस्थापनांची पाहणी करणे आवशक आहे. मात्र, अधिकारी केवळ वेळकाढूपणा करताना दिसून येत आहेत. आज रात्री शहरातील हजारो हॉटेल्समध्ये थर्टी फर्स्टनिमित्त मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध पॅकेजेस जाहीर करण्यात आली असून, यामध्ये मिळणारे अन्नपदार्थ कोणत्या गुणवत्तेचे असणार आहेत हे पाहणे एफडीएचे काम आहे; मात्र त्याचे कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही.

अधिकारी नॉट रिचेबल

नवीन वर्षानिमित्त आयोजित होणार्‍या पार्ट्या आणि हॉटेल्समध्ये मिळणार्‍या अन्नपदार्थांविषयी सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची माहिती घेण्यासाठी एफडीएचे सहआयुक्त (अन्न विभाग) शिवाजी देसाई यांना संपर्क साधला असता त्यांचा मोबाइल नॉट रिचेबल होता.