होमपेज › Pune › अकरावीसाठी महाविद्यालयांकडून जादा शुल्क आकारणी

अकरावीसाठी महाविद्यालयांकडून जादा शुल्क आकारणी

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 12:28AMपुणे : प्रतिनिधी 

अकरावी- बारावीसाठी सरकारने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा दहापट अधिक शुल्काची आकारणी महाविद्यालयाकंडून करण्यात येत आहे. महाविद्यालयाकंडून आकारण्यात येणार्‍या शुल्कावर कोणत्याच प्रकारचे बंधन राहिलेले नाही. शहरातील प्रत्येक महाविद्यालयाचे शुल्क वेगळे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट थांबविण्यासाठी आणि शुल्कामध्ये एकसमानता आणण्यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ शुल्क निश्चित करावे, अशी मागणी शिक्षण सुधारणा मोहीम (सिस्कॉम)च्या  संचालिका वैशाली बाफना यांनी सरकारकडे केली आहे. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनुदानित शाळा व ज्युनियर कॉलेजांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेवरून अकरावीला सरकारने ठरवलेल्या शुल्कापेक्षा 10 पट अधिक शुल्क आकारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. शाळा संहिता 1963 मधील तरतुदींनुसार इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी बृहन्मुंबई विभागात कला, वाणिज्य शाखेसाठी शुल्क 310 रुपये आणि विज्ञान विभागासाठी शुल्क 390 रुपये आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, नागपूर महानगरपालिका क्षेत्रासाठीचे कला, वाणिज्य शाखेसाठीचे शुल्क 280 रुपये आणि विज्ञान शाखेसाठी 360 रुपये आहे. याव्यतिरिक्त राज्यातील अन्य भागांसाठी कला, वाणिज्य शाखेसाठी शुल्क 250 रुपये आणि विज्ञान शाखेसाठी 330 रुपये आहे.

दरम्यान, महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असून माहिती पुस्तिकेत नोंदवण्यात आलेल्या शुल्कापेक्षा दहापट अधिक शुल्क शैक्षणिक संस्था घेत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह इतर शहरांमध्ये देखील अनुदानित शाळा व ज्युनियर कॉलेजांमध्ये शुल्क अधिक घेण्यात येत असल्याच्या तक्रारी पालकांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत. महाविद्यालयांचे शुल्क तत्काळ निश्चित करण्याची मागणी सिस्कॉम संघटनेने केली आहे. तसेच प्रमाणित शुल्काव्यतिरिक्त शुल्क आकारणार्‍या शैक्षणिक संस्थांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी वैशाली बाफना यांनी केली आहे. महाविद्यालयाकडून घेण्यात आलेले अतिरिक्त शुल्क विद्यार्थी आणि पालकांना परत देण्यात यावे, अशी मागणीही बाफना यांनी केली आहे.