Thu, Jul 18, 2019 04:44होमपेज › Pune › ‘रुपी’वरील निर्बंधांना मुदतवाढ

‘रुपी’वरील निर्बंधांना मुदतवाढ

Published On: May 29 2018 1:34AM | Last Updated: May 29 2018 1:01AMपुणे : प्रतिनिधी 

आर्थिक अडचणीतील रुपी को-ऑप. बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीस प्रशासकीय मंडळास यश आले आहे. त्याची दखल घेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपी बँकेवरील निर्बंधांची मुदत आणखी तीन महिन्यांनी वाढवून 31 ऑगस्टअखेर केली आहे. प्रशासकीय मंडळाच्या विनंतीवरून रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेची विशेष तपासणीही पूर्ण केली आहे. त्यांच्या तपासणी अहवालात बँकेच्या कामकाजावर समाधान व्यक्त केल्याची माहिती बँकेकडून देण्यात आली. 

आरबीआयने रुपी बँकेवर टाकलेल्या निर्बंधांची मुदत 31 मेअखेर संपत आहे. त्यामुळे आरबीआयकडे मुदतवाढ मिळण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मंडळाने सहकार विभागामार्फत दाखल केला होता. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही या बँकेवरील निर्बंधास मुदतवाढ मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्‍वासन रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाला दिलेले होते. निर्बंधांच्या मुदतवाढीमुळे ठेवीदारांना दिलासा मिळालेला आहे.

याबाबत रुपी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित दै.‘पुढारी’शी बोलताना म्हणाले की, सध्याच्या प्रशासकीय मंडळाने बँकेचा कार्यभार हाती घेतल्यानंतर थकीत कर्जाच्या वसुलीस प्राधान्य दिले आहे. 

31 मार्च 2018 पर्यंत बँकेने तब्बल 313 कोटी रुपयांची थकीत कर्जांची वसुली पूर्ण केलेली आहे. सन 2017-18 मध्ये 42 कोटी 80 लाख रुपयांइतकी थकीत कर्जाची वसुली पूर्ण झाली आहे. चालू आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये बँकेने आणखी 55 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित धरलेली आहे. त्यादृष्टीने बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेस (ओटीएस) मुदतवाढ मिळण्यासाठी बँकेने सहकार खात्याकडे नुकताच प्रस्ताव दिलेला आहे. त्यास मान्यता मिळाल्यास थकबाकी वसुलीस अधिक गती मिळण्यास मदत होईल.