Fri, Feb 22, 2019 11:30होमपेज › Pune › उभी असलेली एक्सप्रेसची बोगी जळून खाक

उभी असलेली एक्सप्रेसची बोगी जळून खाक

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:22AMपुणे : प्रतिनिधी 

देखभालीसाठी उभ्या असलेल्या एक्सप्रेसच्या बोगीला लागलेल्या भीषण आगीत बोगी पुर्णपणे जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी पुणे रेल्वे स्थानकात मालधक्का येथे घडली. यावेळी आगीची झळ तेथे उभ्या असलेल्या एका लोकल व डेमूलाही लागली. मात्र लोहगमार्ग पोलिसांनी रेल्वे प्रशासनाच्या मदतीने लोकल व डेमूला इंजिन लावून दूर नेल्याने मोठी दुर्घटना टळली. तर अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानक परिसरात एक्सप्रेस गाड्यांच्या काही बोगी तसेच देखभालीसाठी साईड ट्रॅकवर उभ्या आहेत. यातील मालधक्का परिसरात रेल्वे संगम पार्क अधिकारी निवासासमोर दुरुस्तीसाठी आलेल्या पाच बोगी उभ्या होत्या. यातील एका बोगीला दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे पाहून रेल्वे कर्मचार्‍यांनी तातडीने याची माहिती  अग्निशमन दल आणी लोहगमार्ग पोलिसांना दिली. लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निरीक्षक मनोज खंडाळे व अग्निशाम दलाचे विजय भिलारे आपल्या पथकासह तेथे दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्याचे काम सुरु केले.

मात्र शेजारीच लोकल व डेमू गाड्या असल्याने अडथळा निर्माण होत होता. आगीची तीव्रता वाढल्यावर त्याची झळही या गाडयांना बसत होती. यामुळे अग्निशमन दलाचे स्टेशन ऑफिसर भिलारे यांनी तातडीने रेल्वे प्रशासनाला डेम्यू व लोकल इंजिन लावून दूर नेण्यास सांगितले.  दरम्यान गाडीच्या बोगी  एसी असल्याने त्यात फोमचे प्रमाण मोठे होते. यामुळे आग चांगलीच भडकली. तसेच कोचचा दरवाजाही उघडला जात नव्हता. .ही आग दुसर्‍या कोचपर्यंत पसरु नये म्हणून दुसर्‍या बोगी रेल्वे प्रशासनाने दूर नेल्या. आग लागलेली बोगी पूर्णपणे जळून भस्मसात झाल्याने आगीचे कारण समजू शकले नाही. सुमारे एक ते दिड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. तर तासभर कुलींगचे काम सुरु होते. 

उभ्या असलेल्या पाच कोच पैकी चार नंबरच्या कोचला आग लागली होती. तेथे अगोदरच लोहमार्ग पोलिस व रेल्वे कर्मचार्‍यांकडून आग विझविण्याचे काम सुरु होते. सहा लाईन आहेत.त्यात काही रेल्वे गाड्याही उभ्या होत्या. त्यामुळे पाईप तेथपर्यंत नेणे मोठे कष्टाचे काम होते. रेल्वे कर्मचार्‍यांनी प्रथम तीन कोच बाजूला काढल्या होत्या. आम्ही गेल्यावर पाच नंबरचा कोचही बाजूला केला. मात्र हवेमुळे आग सारखी भडकत होती. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. यासाठी गणेश कुंभार, कैलास पायगुडे, राहुल नलावडे, विजय चौरे, पिसाळ आदींनी काम पाहिले.असे अग्निशमन दलाचे विजय भिलारे यांनी सांगितले.