Tue, Aug 20, 2019 04:07होमपेज › Pune › पुण्यातून थेट होणार शेतमाल निर्यात

पुण्यातून थेट होणार शेतमाल निर्यात

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:13AMपुणे : किशोर बरकाले

लोहगाव येथील विमानतळावरून दोन खासगी निर्यातदारांकडून साडेसातशे किलो केळी आणि चारशे किलो भेंडीची प्रायोगिक तत्त्वावर दुबई आणि अबुधाबी येथे निर्यात सुरू झालेली आहे. जवळपास 20 वर्षांनंतर पुण्यातून आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमाल निर्यात सुरू झालेली असून, स्वतंत्र विमानाऐवजी सध्यातरी प्रवासी विमानातून थोड्या प्रमाणात हा शेतमाल पाठविण्यास कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश आलेले आहे. पुणे परिसरात मिळणार्‍या निर्यातक्षम शेतमालाच्या निर्यातीला त्यामुळे मोठी संधी निर्माण झालेली आहे.

कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व फलोत्पादन संचालक प्र. ना. पोकळे यांनी यासाठी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांबरोबर सातत्याने बैठक घेत शेतमाल निर्यातीसाठी पाठपुरावा केला. त्यातून विमानतळावर निर्यातीसाठी लागणार्‍या आवश्यक सुविधा उभारल्या आहेत. 

त्यामध्ये कस्टमचे अधिकार्‍यांना माल तपासणीसाठी जागा, शेतमाल कीडरोग मुक्त असल्याचे प्रमाणपत्रासाठी फायटोसॅनिटरी रूम कार्यान्वित केली आहे. निर्यातक्षम शेतमालामध्ये भविष्यात पुणे जिल्ह्यांसह सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सीताफळ, स्ट्रॉबेरी, अन्य फळे व ताजा भाजीपाला निर्यातीची संधी असल्याची माहिती कृषी विभागाचे निर्यात कक्षाचे प्रमुख आणि तंत्र अधिकारी गोविंद हांडे यांनी दिली. 

या बाबत हांडे म्हणाले की, विमानतळावर आणि आजूबाजूलाही खासगी निर्यातदारांना शेतमाल निर्यातीसाठी आवश्यक असणार्‍या प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेज, रेफर व्हॅनसारख्या अधिक सुविधा वाढविण्याची गरज आहे. सध्या या सुविधांचे प्रमाण कमी आहे. मात्र, प्रायोगिक तत्त्वावर प्रवासी विमानातून भेंडी दोन वेळ आणि केळीची एकवेळ निर्यात खासगी निर्यातदारांनी नुकतीच केली आहे. जळगावची केळी आणि पुणे व सातारा जिल्ह्यांतील भेंडीची निर्यात करण्यात आली आहे. पाच किलोच्या पॅकिंगमध्ये भेंडी निर्यात झाली. अडीच तासांत तेथील बाजारपेठांमध्ये येथील ताजा भाजीपाला ग्राहकांना विमान वाहतुकीमुळे उपलब्ध झाला आहे. पुण्यातून देशांतर्गत बाजारपेठेत शेतमालाची निर्यात लोहगाव विमानतळावरून होत असते. मात्र, मुंबईनंतर पुण्यातून शेतमाल निर्यातीला अधिक संधी असून त्यादृष्टीने कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

पुण्यातून यापूर्वी मोगरा, भाजीपाला निर्यात झाली होती तोट्यात...

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकाराने सर्वप्रथम 1994 मध्ये आखाती देशात मोगर्‍याची निर्यात प्रायोगिक तत्त्वावर लोहगाव विमानतळावरून सुरू करण्यात आली होती.  मात्र, निर्यातीसाठीच्या आवश्यक सुविधांचा अभाव, निर्यातक्षम शेतमाल सातत्याने मिळण्यातील अडचणी आणि खरेदीदार न मिळण्यामुळे ही निर्यात बंद करण्यात आली होती. त्यानंतर राज्य कृषी पणन मंडळाचा पुढाकार आणि हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीची भांडवली गुंतवणुकीतून 1998-1999 मध्ये पुन्हा शेतमाल निर्यातीसाठी प्रयत्न झाले.

सुमारे दीड कोटी रुपयांचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला होता. लोहगाव विमानतळावर शेतमालाच्या निर्यातीस आवश्यक सुविधाही उभारण्यात आल्या. पणन मंडळाकडून शेतमालाची खरेदी मार्केट यार्ड आणि शेतकर्‍यांकडून करण्यात आली. सुमारे 19 विमानांद्वारे शेतमाल निर्यात करण्यात आला होता. 14 ते 18 टनापर्यंत शेतमाल, फुले, फळे व औद्योगिक वस्तू एका विमानातून पाठविण्यात आला.  मात्र, आर्थिकदृष्टया ही निर्यात परवडू न शकल्याने हा प्रकल्पही गुंडाळावा लागल्याचे उदाहरण आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सध्या सुरू असलेली शेतमालाची निर्यात नियमितपणे सुरू ठेवण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे.