Thu, Jan 24, 2019 05:36



होमपेज › Pune › कंत्राटी कामगारांचे शोषण; ठेकेदार गब्बर

कंत्राटी कामगारांचे शोषण; ठेकेदार गब्बर

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 12:45AM



 पिंपरी : प्रदीप लोखंडे

औद्योगिकनगरीत सुमारे पावणे दोन लाख कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना शासनाच्या सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. मालक आणि कंत्राटदारांकडून कामगारांची पिळवणूक केली जात आहे. याविरोधात आवाज उठविल्यास त्यांना कामावरून काढले जात आहे. त्यामुळे शहरातील कंत्राटी कामगार वार्‍यावर  आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे पाच लाख कामगार आहेत. यामध्ये पावणे दोन लाख कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. पूर्वी कायमस्वरूपी कामगार निवृत्‍त झाल्यावर त्यांच्या वारसाला कामावर घेतले जात असे; मात्र सध्या कंत्राटी कामगारांची भरती करून त्यांची पिळवणूक केली जात आहे. कंत्राटदाराकडून कामगारांचा इएसआय, भविष्यनिर्वाह निधींची काही रक्‍कम कापून घेतली जाते. ती संबंधीत विभागाकडे जमा करणे गरजेचे असते; मात्र कंत्राटदाराकडून ती रक्‍कम भरलीच जात नाही. याबाबत मालकाने कामगार आयुक्‍तांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. मात्र, मालकाकडूनही दखल न घेतली गेल्याने कंत्राटदारांवर कारवाई केली जात नाही. 

कामगार संघटनांकडून कामगार आपल्या मागण्या कंपनी प्रशासनापुढे ठेवतात. यासाठी कामगार संघटनाही पुढाकार घेत आहेत; मात्र कंत्राटी कामगारांनी संघटना स्थापण्याचे किंवा सदस्य होण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कंत्राटींना सुरक्षाही मिळेनासी झाली आहे. कायमस्वरूपी काम असणार्‍या ठिकाणी कंत्राटी कामगार ठेवला जाऊ नये, असा कायदा आहे. तात्पुरत्या कामासाठीच कंत्राटी कामगार नेमण्याची तरतूद आहे. या कामावर अपघात झाल्यास त्यांना शासकीय सुविधा मिळाव्यात म्हणून परवाना दिला जातो; मात्र सर्वच क्षेत्रात या कायद्याचा चुकीचा वापर केला जात आहे. कारखाना, स्वच्छतेसारख्या विविध क्षेत्रातही नियमबाह्य कंत्राटी कामगार नेमले जात आहे. त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची मागणी होत आहे. 

Tags : Pimpri, Exploitation, contract, workers