Fri, Jul 19, 2019 05:26होमपेज › Pune › दापोडी-निगडी मार्गावर पालिकेचे ‘प्रयोग’

दापोडी-निगडी मार्गावर पालिकेचे ‘प्रयोग’

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 10:21PMपिंपरी : मिलिंद कांबळे 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी-निगडी या मार्गावर तब्बल 600 कोटी रुपये खर्च करून 180 फुट रुंदीचा प्रशस्त मार्ग 2006ला विकसित करण्यात आला. मात्र, 12 वर्षांनंतरही या मार्गावर वेगवेगळे कामे राबवित, पालिका प्रशासन विविध प्रयोग करीत आहे. पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचे हे उत्तम उदाहरण आहे.

मुंबईच्या धर्तीवर या मार्गावर उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्याऐवजी ग्रेडसेपरेटर बांधण्यात आला. पालिका भवनाचे सौंदर्य कमी होईल, असे किरकोळ कारण पुढे करून उड्डाणपुलास विरोध केला गेला. अधिक निधी खर्च करून ‘टक्केवारी’ लाटण्यासाठी ग्रेडसेपरेटरचा खटाटोप केल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. जड वाहने सहज ये-जा करू शकतील, इतक्या उंचीच्या ग्रेडसेपरेटरऐवजी केवळ 4.5 मीटर उंचीचा बांधण्यात आला. त्यामुळे महिन्यात 4 ते 5 अवजड ट्रॅक येथे अडकून पडतात. आता ही वाहने सर्व्हिस रस्त्यावरून धावत आहेत.

निव्वळ ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी तत्कालीन आयुक्‍त दिलीप बंड यांनी हा चुकीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. तर, नदीपात्राच्या पातळीला समांतर इतक्या खोलीपर्यंत मार्ग असल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. ग्रेडसेपरेटरमुळे मार्गावरील सर्व चौक व्यवस्थितपणे जोडले गेल्याचा दावाही प्रशासन करीत आहे.

हा रस्ता 2006 ला तयार झाला. मार्गावर 7  चौक, 2 ‘टी’ चौक आणि  6 भुयारी (सबवे) मार्ग आहेत. सर्व्हिस रस्त्यावर दोन्ही बाजूने दुहेरी बीआरटी मार्ग सन 2012ला बांधण्यात आला. त्याच दरम्यान, नाशिक फाटा येथे दुमजली उड्डाणपूल बांधण्यात आला. दापोडीतील सीएमई प्रवेशद्वारासमोर भुयारी मार्ग बांधला जात आहे. 

पूर्वी तेथे पादचारी पुलाचे नियोजन होते. तसेच, निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात उड्डाणपूल व ग्रेटसेपरेटर बांधण्याचे काम जोरात सुरू आहे. पालिकेने काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने 5 पादचारी पूल मार्ग उभे केले आहेत.त्यातील 3 पादचारी पुलाचा सर्व्हिस रस्ता ओलांडल्यानंतर वापर करावा लागत आहे. 

आता याच मार्गावर पुणे मेट्रोचे काम सुरू आहे. त्यानंतर या मार्गावर ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत ‘सायकल ट्रॅक’ बनविण्याचे नियोजन आहे. हा मार्गावर पालिकेच्या ‘हुशार’ अधिकारी नियमितपणे विविध प्रयोग करीत आहेत. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीतील कोट्यवधींचा निधी या कामांवर उधळला जात आहे. पालिका अधिकार्‍यांच्या नियोजनशून्यतेमुळे तब्बल 12 वर्षांनंतरही या मार्गावर काम केले जात असल्याचे धक्‍कादायक चित्र आहे.

मार्ग ‘सिग्‍नल फ्री’चा दावा फोल 

निगडी ते दापोडी हा मार्ग ‘सिग्नल फ्री’ करणार म्हणून पालिकेने स्वत:चे कौतुक करून घेतले होते. मात्र, रस्ता बांधून 12 वर्षे लोटली तरी हा रस्ता अजूनही ‘सिग्नल फ्री’ होऊ शकलेला नाही. त्यातून पालिका प्रशासनाचे अपयश समोर येत आहे. नाशिक फाटा चौकात दुमजली उड्डाणपूल बांधूनही दापोडी-निगडी मुख्य मार्गावरील वाहनांना सिग्नलला उभे राहावे लागत आहे. फुगेवाडीतील रेल्वेचा उड्डाणपुलामुळे सिग्नल कायम आहे. त्यामुळे पालिकेचा ‘सिग्नल फ्री’चा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. आता, मेट्रो कामाचे कारण पुढे करून त्यावर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिका करीत आहे.