Sun, May 19, 2019 14:37
    ब्रेकिंग    



होमपेज › Pune › शहरवासीयांना ‘झीरो शॅडो डे’ची अनुभुती

शहरवासीयांना ‘झीरो शॅडो डे’ची अनुभुती

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 14 2018 11:52PM



पिंपरी : प्रतिनिधी 

आपली सावली ही कधी मागे तर कधी पुढे पडताना आपण पाहत असतो. चालताना ती कधी मागेमागे किंवा पुढे पुढे चालत असते. पण आज सावली चक्क मागे किंवा पुढेही नव्हती तर ती बरोबर शरीराच्या मध्यभागी पायाखाली पडल्याचा अनुभव शहरवासियांनी घेतला. दुपारी 12 वाजून 31 मिनिटांनी काही काळ सावली गायब झाल्याचे शहरवासीयांनी पाहिले. ‘झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिन) निमित्त निसर्गाची ही वेगळीच अनुभूती पहायला मिळाली. 

संपूर्ण पृथ्वीवर एकाच दिवशी शून्य सावली दिसते असे नाही. तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात हा अनुभव येत असतो. मे महिन्यातच शून्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. प्रत्येक शहराला अक्षांशानुसार वेगवेगळी वेळ दिली आहे. पुण्यामध्ये 14, 15 ते 18 मे पर्यंत हा परिणाम दिसणारा आहे, असे शहरातील जाणकारांनी सांगितले.पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील भागात तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. परंतु, या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना वर्षातून दोनदा सूर्यबरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणूकाही सावली दिसेनाशी झाली असा काहीवेळ भास होतो. यालाच ‘शून्य सावली दिवस’ असे म्हटले जाते.

आपली किंवा कोणत्याही वस्तूची सावली ही अगदी बरोबर आपल्या पायांच्या किंवा त्या वस्तूच्या खाली लपते आणि त्यामुळे ती दिसत नाही. शहरात दुपारी बारानंतर नागरिक घराबाहेर पडले. या वेळी अनेकांनी कुतूहलाने आपली सावली शून्य झाली आहे की नाही, याचा अनुभव घेतला. काहीनी हा प्रयोग करून पाहिला. अनेकांना आपली सावली केवळ पायाखाली आल्याचे दिसले.