Wed, Apr 24, 2019 19:31होमपेज › Pune › ‘धूमधडाक्यात’रिक्षांचे दिखाऊ पासिंग  सुरू... 

‘धूमधडाक्यात’रिक्षांचे दिखाऊ पासिंग  सुरू... 

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 12:03AMपुणे : नवनाथ शिंदे

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने (आरटीओ) रिक्षांचे जुजबी पासिंग मोशी ट्रॅकच्या बाजूला धूमधडाक्यात सुरू असल्याचे आढळून आले आहे. आगप्रतिबंधक यंत्रणा नसणे, मॉडिफाईड रिक्षा, रिक्षांच्या मागे जाहिरातबाजी, रिव्हर्स गिअर तपासणीसाठी अवघे एक ते दोन मीटरचे अंतर, मोबाईलमध्ये छायाचित्रण, ट्रॅकऐवजी रस्त्याच्या कडेला रिक्षांची तपासणी करण्यात येत आहे; त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाला आरटीओ कर्मचार्‍यांकडून कोलदांडा दाखवला  जात आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जमिनीवरील ट्रॅक नसल्यास वाहनांचे पासिंग 1 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आले होते. दरम्यान दिवे घाटात फिटनेस ट्रॅकची उभारणी पूर्ण झाल्यानंतर 20 नोव्हेंबरला नव्याने वाहनांचे पासिंग सुरू करण्यात आले.  रिक्षा संघटनांच्या आंदोलनामुळे दिवे घाटातील ट्रॅकचे अंतर दूर असल्यामुळे मोशी येथील ट्रॅकवर रिक्षांच्या पासिंगचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, रिक्षा पासिंगच्या फिटनेस तपासणीत पारदर्शकता नसल्याचे आढळून येत आहे.

दै. ‘पुढारी’च्या बातमीदाराने गुरुवारी (दि. 18) रिक्षा पासिंगची पाहणी केली. त्या वेळी 25 ते 27 रिक्षा पासिंगसाठी रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आल्या होत्या. बहुतांश एजंटांच्या मार्फत आलेल्या रिक्षांच्या पासिंगसाठी मोटार वाहन निरीक्षकांच्या वतीने दिखाऊ तपासणी करण्यात आली. पासिंगसाठी आलेल्या अनेक  रिक्षांमध्ये आगप्रतिबंधक यंत्र उपलब्ध नसणे, अनेक रिक्षाच्या पाठीमागे पाहण्यासाठी मोकळी जागा नसणे, रिव्हर्स गिअर नसल्याचे दिसून आले; तरीही अशा रिक्षांना फिटनेस असल्याची पावती देण्यात आली. 

रिक्षा पासिंग करताना मोटार वाहन निरीक्षकाकडून लाईट, इंडिकेटर, अपर-डीपरची तपासणी केली जात होती. प्रत्यक्षात मात्र, पासिंगसाठी आणलेल्या एजंटांच्या अनेक रिक्षांना प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी साईट रॉड बसविण्यात आला नव्हता. तसेच फिटनेसची तपासणी करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ट्रॅकऐवजी मुख्य रस्त्याच्या कडेला रिक्षांची तपासणी करण्यात येत हेाती. त्यामुळे रिक्षांचा रिव्हर्स गिअर तपासणीसाठी अवघ्या एक ते दीड मीटर अंतराचा वापर करण्यात येत होता. तपासणीदरम्यान एका रिक्षाचालकाला  (एमएच 12-2366)  ब्रेक न लागल्याने रिक्षा चक्क मोटार वाहन निरीक्षकाच्या पायावर गेली. त्यामुळे कर्मचार्‍यास किरकोळ दुखापत झाली. दरम्यान ही रिक्षा एजंटमार्फत पासिंगसाठी आल्याने कोणत्याही अडथळ्याशिवाय तिचे पासिंग करण्यात आले; त्यामुळे फक्त एजंटांकडून पासिंगसाठी येणार्‍या रिक्षा मोटार वाहन निरीक्षकांच्या जोखडातून सहीसलामत सोडल्या जात आहेत. 

प्रवाशांची काळजी घेण्यासाठी मोटार वाहन कायद्यानुसार वाहनांची योग्य फिटनेस तपासणी करणे आरटीओला बंधनकारक आहे; मात्र सर्वसामान्य रिक्षाचालक आणि एजंट मध्यस्थी रिक्षाचालक यामध्ये प्रशासनाकडून दुजाभाव केला जात आहे.  एजंटाकडून पासिंगसाठी आलेल्या रिक्षा मॉडिफाईड असोत किंवा विनारिव्हर्स गिअर तसेच जाहिरातबाजी करून आलेल्या रिक्षांना विनासायास ग्रीन सिग्नल दिला जात आहे. तर विनाएजंट रिक्षा पासिंगसाठी आलेल्या चालकांना धडा शिकविण्यासाठी एक एजंट टोळी साहेबांना मार्गदर्शन करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्वसामान्य रिक्षाचालकांच्या रिक्षा पासिंगसाठी प्रशासन एजंटांची साथ सोडणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.