Mon, Jun 17, 2019 18:16होमपेज › Pune › गणपती मिरवणूकीतील उधळपट्टी थांबली पाहिजे : पुरंदरे 

गणपती मिरवणूकीतील उधळपट्टी थांबली पाहिजे : पुरंदरे 

Published On: Aug 05 2018 9:12PM | Last Updated: Aug 05 2018 9:12PMपुणे : प्रतिनिधी 

पुण्यात सध्या ३०-३० तास गणपतीची मिरवणूक सुरु असते. गणपतीचा तुम्ही ३० तास छळ करत असता. खरंच अशा गोष्टींची काही गरज आहे का, याचा विचार व्हायला हवा. माणसांना जागे करण्याची गरज असून गणपती मिरवणूकीतील उधळपट्टी थांबवली पाहिजे. अशा गोष्ठींना आवर घालण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले.

भोई प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांच्या अनाख मुलांसाठी आयोजित पुण्यजागर या शिक्षण सेवा प्रकल्पाचा शुभारंभ रविवारी झाला. यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे बोलत होते. यावेळी अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी, माजी पोलीस अधिकारी व्ही लक्ष्मीनारायण, पोलिस महानिरिक्षक डॉ. विठ्ठल जाधव, ले. ज. निवृत्त राजेंद्र निंभोरकर आदी उपस्थित होते. 

यावेळी बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, गरिब असणे गुन्हा नाही. पण गरिबीचा अभिमान बाळगणे चुकीचं आहे. सध्या आपण गणपतीची मिरवणूक ३० तास काढतो. ही चुकीची गोष्ठ असून पेपरमध्ये गेल्यावर्षी पेक्षा दिड तास मिरवणूकीला उशिर.. असे अभिमान बाळगण्यासारखा मथळा दिला जातो. अशा गोष्टींना आवर घालण्याची गरज आहे. एक माणूस सारख्या जगाचं दुःख घालवू शकणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी काम करायला हवं. समाजाने लोंकाची दुखे कमी करण्यासाठी काम केले पाहिजे, असेही पुरदंरे यावेळी म्हणाले. 

यावेळी नरेंद्र जाधव म्हणाले की, अनाथ मुलांना सहकार्य करणे सरकारची जबाबदारी आहे. सामाजिक संस्थांनी ही यामध्ये पुढे येऊन कार्य करण्याची गरज आहे. पुण्यजागर च्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील २६ अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे. अशी परस्थिती न येण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवा. विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मायेचे छत्र उभा करण्याचे काम भोई प्रतिष्ठानचे केले आहे, असे जाधव यावेळी म्हणाले.

व्ही. लक्ष्मीनारायण म्हणाले, शेतकरी आत्महत्या करतो हे शोधणे गरजेचे आहे. १९९८ ते २०१८ पर्यंत ३ लाख शेतकर्‍यांनी देशात आत्महत्या केल्या. शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकल्या तर आपण ३ लाख पुस्तके लिहू शकतो. शेतीला चांगले दिवस आल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत, असेही लक्ष्मीनारायण म्हणाले.  

निंभोरकर म्हणाले, गावाकडे सेवा सुविधा पोहचल्या की पैशांची आवश्यकता भासायला लागली. पूर्वी गावात लोकांची एकी होती. मात्र आता तशी परस्थिती राहिली नाही. अनाथ विद्यार्थ्यांना सरकार मदत करण्यास तत्पर आहे, असे भुषण गगराणी म्हणाले. यावेळी अनाथ मुलांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. 

पराग ठाकूर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिरीष मोहिते यांनी आभार मानले.