Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Pune › ‘स्मार्टफोन’ने मुलांना ओढले जाळयात

‘स्मार्टफोन’ने मुलांना ओढले जाळयात

Published On: Feb 25 2018 1:16AM | Last Updated: Feb 25 2018 12:40AMपुणे : ज्ञानेश्‍वर भोंडे

सध्याच्या काळात स्मार्टफोनचा वापर हा अडीच वर्षे ते किशोरवयीन मुलांकडून वाढत असून त्याचा सर्वाधिक दुष्परिणाम त्यांच्यावर दिसून येत आहे. स्मार्टफोनच्या अतिवापराचे मुलांमध्ये व्यसन लागत असून त्यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा  वाढू लागला आहे. तसेच डोळयांचा नंबर वाढणे, वजन वाढणे, एकाग्रता कमी होणे  असे लक्षणे दिसून  येत आहेत. स्मार्टफोनमुळे होणा-या दुष्परिणामांमुळे पालक हैराण झाले असून किमान दहावी होईपर्यंंत तरी मुलांना स्मार्टफोन देउच नये असे डॉक्टर सांगतात.

सध्याचे युग हे स्मार्टफोनचे आहे. त्यामध्ये उपलब्ध असलेले अ‍ॅप्लिकेशन हे मोठयांसाठी जरी उपयोगी ठरत असले तरी लहान मुलांसाठी मात्र धोकादायक ठरत आहेत. स्मार्टफोनमधील गुगल, गेम, युटयूब व इतर अ‍ॅप्लिकेशन यांचा मुलांकडून अतिवापर होत आहे. गुगलवर एका सेकंदात मिळणा-या उत्‍तरांमुळे मुलांमध्ये विचार करण्याची प्रवृत्‍ती कमी होत आहे. जी उत्‍तरे पुस्तकांतून, निरीक्षण करून किंवा इतरांना  विचारून मिळवायची असतात ती गुगलवरून सेकंदात मिळवली जात आहेत. यामुळे त्यांची विचार करण्याची प्रवृत्‍ती कमी होणे, कुतूहल कमी होत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवले जात आहे. 

सध्या मुलांचे आईवडिल कामात बिझी असतात. त्यातच मुलांच्या हातात स्मार्टफोन दिला तर ते शांत बसतात. इथूनच मुलांना स्मार्टफोनचे व्यसन लागण्यास सूरवात होते आणि नंतर त्यापासून त्याचे शारीरिक नसले तरी वागणुकीसंदर्भात दुरगामी परिणाम दिसून येतात. मग त्यांच्या हातातून स्मार्टफोन काढून घेतला तर ते लगेच चिडचिड करतात. तसेच अभ्यासात लक्ष न लागणे, रात्री उशिरापर्यंत झोप न येणे, किशोरवयात गुगलवर नको त्या गोष्टींची माहिती मिळाल्याने ते वयात येण्याआधीच ‘मॅच्युअर’ होत आहेत.

स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांना लवकरच  चष्मे लागत आहेत. कारण मुलांच्या डोळयांच्या बाहुल्यांवर स्मार्टफोनच्या प्रखर प्रकाशाचा परिणाम होत आहे. यामुळे त्यांच्या डोळयांचा नंबर वाढत असून कमी वयात चष्मा लागत आहे. तसेच रात्री उशिरापर्यंत जर स्मार्टफोनचा वापर केल्यामुळे मुलांच्या डोळयांवर परिणाम तर होतोच त्याचबरोबर झोपेवरही परिणाम होत आहे.

स्मार्टफोनचे मुलांवरील दुष्परिणाम

चिडचिडेपणा, स्वमग्‍नता
डोळयांवर ताण आल्याने मिचकावणे, पाणी येेणे, चष्मा लागने, रात्री उशिरा झोपणे, प्रसंगी दृष्टी जाणे
एकाग्रता - कुतूहल कमी होणे, वाचन कमी होणे

वागणुकीचे परिणाम

स्मार्टफोनच्या अतिवापराचे शरीरावर किंवा मेंदुवर प्रत्यक्ष परिणाम होत नसले तरी अप्रत्यक्ष परिणाम होत आहेत. यामुळे वागण्यातील दोष, एकाग्रता न होणे दिसून येत आहे. अशा प्रकारच्या तक्रारी असलेले 25 टक्के पालक येत आहेत.  -डॉ. संदीप पाटील, लहान मुलांचे मेंदुविकारतज्ज्ञ, शिवाजीनगर

स्मार्टफोनचा मुलांवर गंभीर परिणाम

गेल्या पाच वर्षांत वय वर्षे अडीच ते किशोरवयीन मुलांमध्ये स्मार्टफोनचा वापर मोठया प्रमाणात वाढला आहे. यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा, चष्मा लवकर लागणे, शरीराची हालचाल न झाल्याने लठठपणा वाढणे, खेळांकडे दुर्लक्ष, स्वमग्‍नता अशा तक्रारी घेउन पालक येत आहेत. म्हणून मुलांना स्मार्टफोनपासून दुर ठेवणे आवशक आहे. -डॉ. संताजी कदम, जनरल फिजिशियन, कर्वेनगर