Tue, Apr 23, 2019 18:02होमपेज › Pune › बीआरटीएस मार्गातील कासारवाडीतही खोदकाम

बीआरटीएस मार्गातील कासारवाडीतही खोदकाम

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:01AMपिंपरी : प्रतिनिधी

दापोडी-निगडी या दुहेरी बीआरटीएस मार्गावर पुणे मेट्रोने काम सुरू केले आहे. त्यामुळे खराळवाडी ते मोरवाडीच्या शॉपींग मॉलपर्यंत बीआरटीचा मार्ग बदलावा लागणार आहे. आता मेट्रोने कासारवाडीतील बीआरटी मार्गातही काम सुरू केले आहे. तेथेही बीआरटी मार्गासह बसथांबाही हटवावा लागणार आहे. परिणामी, बीआरटी मार्गातील अडथळे संपता संपत नसल्याचे चित्र आहे. 

बीआरटी मार्गावर वाहने व प्रवाशांसाठी सुरक्षा उपाययोजना कराव्यात, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या पथकामार्फत पाहणी करून दिलेल्या अहवालानुसार या 25 किलोमीटर मार्गावर विविध सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत, असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने केला जात आहे. अद्यापही हे काम सुरूच आहे. 

पुणे मेट्रोच्या वतीने मार्च महिन्यापासून खराळवाडी, पिंपरी चौक, मोरवाडी फिनोलेक्स चौक आणि शॉपींग मॉलपर्यंत बीआरटीच्या मार्गातच पिलर उभारणीचे काम वेगात सुरू झाले. या संदर्भात ‘पुढारी’ने सर्वांत प्रथम छायाचित्रासह वृत्त प्रसिदध केले. त्यामुळे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. सदर काम रोखण्यात येईल, असे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. बीआरटीमधील दोन दिवसांच्या ‘ट्रायल रन’साठी बंद ठेवून, मेट्रोने पूर्वीप्रमाणे काम सुरू ठेवले आहे. 

आता मेट्रोने कासारवाडी भुयारी मार्गाच्या जवळील बीआरटी मार्गावरच्या बाजूने लोखंडी पत्रे लावून खोदकाम सुरू केले आहे. त्यामुळे या मार्गावरील कासारवाडीचा बस थांबाही हटवावा लागणार आहे. खराळवाडी ते मोरवाडी चौकापर्यंतच्या मार्गानंतर कासारवाडीतही बीआरटी मार्गात मेट्राचे अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी, मेट्रो मार्गावर बीआरटीचे बॅरिकेटस काढून तेथे संमिश्र बीआरटी करण्याची नामुष्की पालिकेवर येणार आहे.